भानगावच्या ऐतिहासिक दगडी बारवेची स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:17+5:302021-04-01T04:22:17+5:30
श्रीगोंदा : महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाउण्डेशनच्या मावळ्यांनी होळीच्या दिवशी भानगावचे ग्रामदैवत भानेश्वर मंदिरासमोरील ऐतिहासिक दगडी ...
श्रीगोंदा : महाराष्ट्र बारव मोहिमेंतर्गत शिवदुर्ग ट्रेकर्स फाउण्डेशनच्या मावळ्यांनी होळीच्या दिवशी भानगावचे ग्रामदैवत भानेश्वर मंदिरासमोरील ऐतिहासिक दगडी बारवेची स्वच्छता करून व सतीशिळासमोर दिवे लावले. अशा प्रकारे आगळावेगळा होळीचा उत्सव साजरा केला.
शिवदुर्ग ट्रेकर्स फाउण्डेशनचे सदस्य गणेश कुदांडे, मारुती वागस्कर, अक्षय गायकवाड, आविष्कार इंगळे, राजेश इंगळे यांनी होळी सणाच्या मुहूर्तावर पानिपत युद्धाचा संदर्भ असलेली व महादजी शिंदे घराण्याचा वारसा सांगणारी भानगाव येथील ऐतिहासिक टी आकाराच्या दगडी बारवेची स्वच्छता केली. येथे झाडलोट करून रांगोळी काढून फुलांनी आणि दिवे लावून सजावट करण्यात आली. या उपक्रमासाठी पुण्यातील इतिहास लेखक अनिल दुधाने, रोहन काळे यांचे मार्गदर्शन लाभले.
भानगाव येथे युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या तीन शूरवीरांच्या तीन पत्नी एकाचवेळी सती गेल्याची दुर्मीळ सतीशिळा येथे पहावयास मिळते. भानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस वीरगळ आणि सतीशिळा मांडलेल्या दिसून येतात.
---
शिवदुर्ग परिवाराच्या टीमने श्रीगोंदा तालुक्यातील गावोगावी असणारा ऐतिहासिक वारसा, बारव स्वच्छता करून जपण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याला महाराष्ट्र बारव मोहीम टीमच्या सदस्यांनी सहकार्य केले. भानगाव येथील पहिली बारवेची सफाई करून सतीशिळासमोर दीपोत्सव केला आहे.
-राजेश इंगळे,
अध्यक्ष, शिवदुर्ग ट्रेकर्स फाउण्डेशन
--
३१भानगाव
भानगाव येथील ऐतिहासिक बारवेची स्वच्छता करताना शिवदुर्गचे तरुण.