पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळेच हवामानात बदल : तज्ज्ञांचा सूर
By अनिल लगड | Published: September 2, 2018 03:43 PM2018-09-02T15:43:36+5:302018-09-02T15:45:34+5:30
गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील बोटा, घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यानंतर नाशिक च्या मेरी संस्थेच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी करून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले.
अनिल लगड
अहमदनगर : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नगर जिल्ह्यातील बोटा, घारगाव परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धक्क्यानंतर नाशिक च्या मेरी संस्थेच्या पथकाने परिसरात जाऊन पाहणी करून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले. भूकंपासारख्या विनाशकारी आपत्तीचा सामना करण्यासाठी भविष्यात नागरिकांनी सावधगिरी व जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जागतिक पातळीवरील शास्त्रज्ञ, संशोधकांनी भूकंप आणि हवामानबदलावर अभ्यास करण्याची गरज आहे. पृथ्वीचे वाढत्या तापमानामुळे हवामानात बदल निर्माण होऊन भूकंप, अतिृवष्टी, दुष्काळासारखे संकट ओढावले असल्याचे मत जिल्ह्यातील तज्ज्ञांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
भूगर्भातील हालचाली, पृथ्वीच्या तापमानातील होत असलेले वाढ हेच भूकंप, पूर, अतिवृष्टीला कारणीभूत आहेत. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे हा यावर उपाय आहे, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले.
ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आणि पर्यावरणातील बिघाड यामुळे घारगावसारखे भूकंपाचे धक्के बसत आहेत. महाराष्टÑ देखील काही ठिकाणी अतिवृष्टी तर कुठे दुष्काळीस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे भूगर्भातील खनिजांवर परिणाम होऊन हे वातावरणीय बदल घडत आहे. सी-लेव्हलमध्ये फरक पडत असून समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.
- सुधीर फडके, भूगर्भाचे अभ्यासक, अहमदनगर
भूगर्भातील घडामोडींमुळे वातावरण बदल होतात. या बदलांमुळे भूकंप, पाऊस पडतो. परंतु गेल्या अनेक वर्षापासून जागतिक पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. त्यामुळे अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के बसतात. त्याचप्रमाणे पावसावर देखील परिणाम होतो. कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळीस्थिती निर्माण होते. याचा परिणाम शेतीवर होऊन त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील परिणाम होत आहे. यासाठी निसर्गाबरोबर मानवाने देखील बदल स्वीकारण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी देखील पारंपरिक पिके घेण्याच्या प्रयत्न करावा. जेणेकरून शेतक-यांचे नुकसान टळेल.
-डॉ.थॉमस पडघडमल, वॉटरशेड, व्यवस्थापक, आॅर्गनायझेशन ट्रस्ट, सामाजिक विभाग, अहमदनगर.
७० लक्ष, दशलक्ष वर्षापूर्वी ज्वालामुखीपासून महाराष्टÑातील पठारभाग तयार झाला आहे. पूर्वी या पठारांची उंची खूप होती. परंतु अतिवृष्टीमुळे व नद्यांच्या जाडीमुळे व ठिकठिकाणी तडे गेल्याने पठारांची उंची कमी होत गेली. त्यामुळे १९६७ पासून महाराष्टÑात भूकंपाचे धक्के बसू लागले. प्रथम कोयना, खर्डी, लातूर परिसरात भूकंप झाला. गेल्या काही दिवसापासून घारगाव, बोटा परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. यासाठी नागरिकांनी आरसीसी किंवा पत्र्यांच्या घरात वास्तव्य करावे. जेणे करुन हानी होणार नाही.
-प्रा. बी. एन. शिंदे, हवामान तज्ज्ञ, अहमदनगर.
पृथ्वीच्या पोटातून रोज अब्जावधी लिटर डिझेल, पेट्रोलचा उपसा होत आहे. यामुळे भूर्गातील हालचाली मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत जगातील भूगर्भ शास्त्रज्ञ कित्येक दिवसापासून सांगत आहेत. परंतु त्याकडे कोणाचेही लक्ष नाही. देशात रोज करोडो वाहने धावतात. त्याच्या कार्बनडायआॅक्साईडचा परिणाम होत आहे. हेच खरे ग्लोबल वॉर्निंगचे कारण आहे. यामुळेच बोटा, घारगावसारखे भूकंपाचे धक्के बसतात. याचा परिणाम हवामान बदलावर होऊन कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ पडत आहे. मी ‘भूकंपाचे धक्के’ हे पुस्तक लिहिले आहे. याबाबत दीड वर्षापूर्वी घारगाव परिसरात अनेक ग्रामपंचायतींच्या सरपंच यांना पुस्तके मोफत वाटून जनजागृती केली होती. हे टाळायचे असेल तर पर्यावरणाचा समतोल राखणे हाच उपाय आहे.
-सुधाकर केदारी, भूकंपाचे अभ्यासक, नगर.