वातावरणातील बदलाने सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 03:46 PM2020-11-22T15:46:11+5:302020-11-22T15:47:03+5:30
अहमदनगर शहरात दहा रुग्णांमागे सात रुग्ण सर्दी, खोकल्याचेच आढळून येत आहेत. दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असे विषम हवामान सध्या आहे. वातावरणात झालेला हा बदल सर्दी-खोकल्याला निमंत्रण देणारा ठरला आहे. त्यामुळे नागरिक व लहान मुलांनी स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन शहरातील तज्ज्ञांनी केले आहे.
अहमदनगर : शहरात दहा रुग्णांमागे सात रुग्ण सर्दी, खोकल्याचेच आढळून येत आहेत. दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असे विषम हवामान सध्या आहे. वातावरणात झालेला हा बदल सर्दी-खोकल्याला निमंत्रण देणारा ठरला आहे. त्यामुळे नागरिक व लहान मुलांनी स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन शहरातील तज्ज्ञांनी केले आहे. मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच जास्त सर्दी, खोकला सुरू असल्याचे दिसून आले आहे.
कोरोनामुळे सर्दी-खोकला आला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवायचे की नाही? असा संभ्रमही पालकांमध्ये आहे. कोरोना नसला तरी पावसाळा व हिवाळा या दोन ऋतूंच्या बदलामध्ये वातावरणात मोठा बदल झालेला आहे. हा बदल स्वीकारण्याइतकी प्रतिकारशक्ती मुलांमध्ये नसते. त्यामुळे या बदलाचा सर्वाधिक त्रास मुलांना होतो, असे शहरातील तज्ज्ञांनी सांगितले. आतापर्यंत शाळा बंद होत्या. त्यामुळे मुलेही एकमेकांना भेटण्यापासून दूर होती. अन्यथा हे प्रमाण आणखी वाढले असते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
हवेतील प्रदूषण, फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण, वातावरणात अचानक झालेला बदल, दिवसभर ऊन आणि रात्री थंडी अशा वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला होताच नागरिकांनी तात्काळ उपचार करावेत. धूर, धूळ, गोड पदार्थामुळे सर्दीत वाढ होते. दूषित पाण्यामुळे काही ठिकाणी जुलाबाचेही रुग्ण आढळून येत आहेत.
-डॉ. सूचित तांबोळी, बालरोगतज्ज्ञ.
घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढते, त्याचा परिणाम मलेरिया, चिकुनगुणिया, गोचीड अशा आजारांमध्ये होतो. ढगाळ हवामानामुळे अस्थमा, दम्याचेही रुग्ण वाढले आहेत. उष्ण पदार्थ खाणे, सकस आहार घेणे, मोड आलेली कडधान्ये खाणे, बेकरीचे पदार्थ, जंकफूड खाणे टाळणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. वातावरणात बदल झाला तरी त्याचा परिणाम होणार नाही.
-डॉ. अक्षय भुसे, पटवर्धन चौक.
सध्या विषम हवामान आहे. दहा रुग्णांमध्ये सर्दी-खोकला असलेले रुग्ण आहेत. दहा रुग्णांमागे सात रुग्ण सर्दी-खोकला असलेले आहेत. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे. लहान मुलांची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांची व मोठ्यांनीही प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत.
-डॉ. सुबोध देशमुख, सावेडी.