वाळू उचलण्यावरुन दोन गटात हाणामारी
By Admin | Published: May 27, 2017 04:43 PM2017-05-27T16:43:43+5:302017-05-27T16:44:05+5:30
मुळा नदीच्या पात्रातून वाळू उचलण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली़ यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत़
आॅनलाईन लोकमत
अहमदनगर, दि़ २७ - राहुरी तालुक्यातील मांजरी येथे मुळा नदीच्या पात्रातून वाळू उचलण्यावरुन दोन गटात हाणामारी झाली़ यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत़
मुळा नदीच्या काळावर मांजरी (ता़ राहुरी) व पानेगाव (ता़नेवासा) हे दोन्ही गावे शेजारी-शेजारी आहेत़ या गावांच्या हद्दीतून वाळू उपशास परवानगी नाकारण्यात आली आहे़ तथापि, स्थानिक नागरिक घरगुती वापरासाठी वाळू नेऊ शकतात़ मांजरी येथे चंद्रगिरी महाराज मंदिराचे काम सुरु आहे़ या कामासाठी मांजरी ग्रामस्थ शनिवारी मुळा नदीतून वाळू उपसत होते़ ही बाब पानेगाव (ता़ नेवासा) येथील काही तरुणांना समजली़ त्यांनी तात्काळ नदीपात्राकडे धाव घेत वाळू उपसा करणाऱ्या मांजरीकरांना वाळू तस्कर समजून मारहाण करण्यास सुरुवात केली़ दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना मारहाण केली़ यात राहुल रामभाऊ जांभूळकर, आबासाहेब अण्णाभाऊ विटणकर (रा़ मांजरी), किशोर लक्ष्मण जंगले (रा़ पानेगाव) हे तिघे जखमी झाले़ त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत़ दरम्यान वाळू उपसणारे मांजरी गावचे असल्याचे समजताच पानेगावच्या तरुणांनी माफी मागून प्रकरण मिटविल्याचे समजते़