इंग्रजांचा प्रोटोकॉल बंद करा; अण्णांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:22 AM2019-02-08T05:22:58+5:302019-02-08T05:23:13+5:30
इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे.
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : इंग्रजांच्या राजवटीतील प्रोटोकॉल बंद करा. लोकशाहीत जनता मालक व अधिकारी सेवक आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी जनतेपर्यंत जाऊन त्यांचे निवेदन स्वीकारले पाहिजे. लोकशाहीत लोकाभिमुख शासन व प्रशासन असायला हवे, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी दिलेल्या एका पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
हजारे यांनी या पत्रकात म्हटले आहे की, इंग्रज या देशातून जाऊन ७२ वर्षे उलटली आहेत. मात्र इंग्रजांनी केलेला प्रोटोकॉल आजही आहे. प्रोटोकॉल म्हणजे लोकशाहीवरचा आघात आहे. पण सरकारला तसे का वाटत नाही? सेवक खुर्चीमध्ये बसून मालकाची निवेदने घेत नसतील तर हा लोकशाहीचा व लोकतंत्राचा अवमान आहे. हजारे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धी ग्रामस्थांच्या वतीने ४ फेब्रुवारीला अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे प्रोटोकॉलचे कारण देत मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारायला आले नव्हते. याबद्दल हजारे यांनी उपोषण सोडताना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत प्रोटोकॉल रद्द करण्याची मागणी केली होती.