१५ दिवसांच्या आत पोल्ट्री बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:21 AM2021-04-04T04:21:05+5:302021-04-04T04:21:05+5:30
आंबी खालसा परिसरातील माळेगाव फाटा येथे पोल्ट्री फार्म आहे. आजूबाजूला लोकवस्ती आहे. या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या विष्ठेमुळे परिसरात दुर्गंधी ...
आंबी खालसा परिसरातील माळेगाव फाटा येथे पोल्ट्री फार्म आहे. आजूबाजूला लोकवस्ती आहे. या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या विष्ठेमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. माश्यांमुळे घरात जेवण करणे कठीण झाले असून लहान मुले आणि वृद्ध यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्य:स्थितीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात असून सदर पक्षी ने-आण करण्यासाठी पुणे-मुंबईहून वाहने ये-जा करत असल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती बळावत आहे. माशांमुळे साथीचे रोग वाढण्याची शक्यता आहे तसेच पोल्ट्रीमधील मृत पक्षी माळेगाव घाटात टाकले जात असून परिसरातील श्वान ते मानवी वस्तीत आणून त्याची दुर्गंधी पसरवत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या सर्व प्रकारामुळे येत्या १५ दिवसाच्या आत पोल्ट्री बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे आरोग्यमंत्र्यांसह, ग्रामपंचायत, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र घारगाव यांना केली आहे.
या निवेदनावर राजेंद्र गाडेकर, राजेंद्र डोके, महादू मुंढे, रवींद्र भोर, मिलिंद थोरात, रवींद्र काशीद, ईश्वर भोर, बाळासाहेब गाडेकर, नामदेव गाडेकर यांसह सुमारे २०० नागरिकांनी सह्या केल्या आहेत.