बंद कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:21 AM2021-03-31T04:21:47+5:302021-03-31T04:21:47+5:30
अहमदनगर : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या ...
अहमदनगर : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतिगृह व एम्स रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
शहरात दररोज ४०० ते ५०० नव्या रुग्णांची भर पडत आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. खासगी रुग्णालयांतील उपचार घेणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहे. लॉकडाऊनच्या काळात महापालिकेने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने तंत्रनिकेतन महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, एम्स रुग्णालय, आनंद लॉन आदी कोविड केअर सेंटर सरू केले होते. हे सर्व सेेंटर फुल्ल झाले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने ते बंद करण्यात आले होते. परंतु, गेल्या पाच दिवसांत अचानक रुग्ण वाढले आहेत. महापालिकेने नटराज हॉटेल कोविड केअर सेंटर सुरू केले आहे.या सेंटरमध्ये गेल्या पाच दिवसांपूर्वी तीन रुग्ण दाखल होते. तिथे वाढ होऊन ६८ रुग्ण दाखल झाले असून, जैन पितळे बोर्डिंगच्या इमारतीत १५ महिला दाखल झाल्या आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी आढावा घेऊन सामाजिक संस्थांशी चर्चा केली. रोटरी क्लबने शासकीय तंत्रनिकेतन व घर घर लंगर सेवा संस्थेने एम्स, नटराज आणि जैन पितळे बोर्डिंग केअर सेंटर येथे जेवन नाष्ट्याची सुविधा पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. या संस्थेकडून नटराज व जैन पितळे बोर्डिंग येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना जेवण व नाष्टा पुरविला जात आहे. एम्स रुग्णालयातील रुग्णांना ही संस्था जेवण व नाष्टा पुरविणार आहे.
रुग्ण वाढत संख्या झपाट्याने वाढत असल्याने महापालिकेने बंद पडलेले कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय सविधा महापालिकेकडून पुरविली जाणार असून, इतर सुविधांसाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. सामाजिक संस्थाही मदतीसाठी पुढे येत आहे. परंतु, या संस्थांना पूर्वीप्रमाणे अर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यामुळे या संस्थांसमोर सुविधांचा खर्च कसा भागवायचा? असा प्रश्न आहे.
....
बुथ हॉस्पिटल फुल्ल
येथील बुथ हॉस्पिटलमध्ये १४५ खाटांची सुविधा आहे. हे रग्णालय फुल्ल झाले आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनचे ९५ बेड उपलब्ध आहेत, इतर मनपाच्या कोविड सेंटरमध्ये मात्र ऑक्सिजनची सुविधा नाही. त्यामुळे ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल व्हावे लागत असून, ऑक्सिजनचे बेड वाढविण्याची मागणी होत आहे.