निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ अकोले तालुक्यात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 12:25 PM2020-02-23T12:25:07+5:302020-02-23T12:26:08+5:30
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि.२३ फेब्रुवारी) अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावागावातून तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
अकोले : निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रविवारी (दि.२३ फेब्रुवारी) अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. या बंदमध्ये गावागावातून तरुण, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.दरम्यान सकाळी अकोले तालुक्यातील इंदोरी ते अकोले नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी रॅली काढली होती.
भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी इंदोरीकर महाराजांनी गर्भलिंग निदान प्रकरणी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला होता. यावेळी इंदोरीकर महाराजांना काळे फासण्याचा इशारा देसाई यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर देसाई यांना अकोले तालुक्यात पाय ठेवू देणार नाही, असा निर्धार करीत बंद पाळला.
अकोले तालुक्यातील १०० हून अधिक ग्रामपंचायतींनी इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ ठराव केला. अकोले येथे सकाळी ११ वाजता सभा झाली. अध्यक्षस्थानी विष्णू महाराज वाकचौरे हे होते. प्रास्ताविक दीपक महाराज देशमुख यांनी केले. याप्रसंगी योगी केशवबाबा, माजीमंत्री मधुकर पिचड, आमदार किरण लहमटे, मधुकर नवले, स्मिता अष्टेकर, माजी आमदार वैभव पिचड, योगी केशव चौधरी, अशोक भांगरे, सीताराम गायकर, शिवाजी धुमाळ, जालिंदर वाकचौरे, गिरजाजी जाधव, वकील के.डी.धुमाळ, मच्छिंद्र धुमाळ, वसंत मनकर, मारुती मेंगाळ, महेश नवले, अमित भांगरे, सतिष भांगरे, मंदाबाई नवले, विवेक महाराज केदार, फरगडे महाराज यावेळी उपस्थित होते.
निवृत्ती महाराजांच्या नादी लागू नको. ही अकोलेची माती आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती वाकचौरे यांनी यावेळी दिला.
अकोल्यातील सर्व महिलांनामध्ये मला आज स्मिता अष्टेकर दिसतात. या तालुक्यातील सर्व महिला वाघिणी आहेत, असे अष्टेकर यांनी म्हणाल्या.