कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा मंदिर दर्शनासाठी आज सायंकाळपासून बंद होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:09 AM2020-03-17T10:09:40+5:302020-03-17T10:09:51+5:30
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवार, सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
शिर्डी: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आज सायंकाळपासून साई मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी पुजाऱ्याच्या माध्यमातून पूजा, अर्चा नेहमीप्रमाणे सुरू असतील. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी बुधवार, सकाळी दहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. यावेळी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
आज दुपारी तीन नंतर जनसंपर्क व बायोमेट्रिकचे पासेस देणे बंद करण्यात येईल, त्यानंतर पास घेतलेल्या भाविकांचे पाच वाजेपर्यंत दर्शन होऊन हे भाविक बाहेर पडतील. सायंकाळच्या धुपारतीला आज केवळ पुजारी असतील असा निर्णय होऊ शकतो, शिर्डीत आलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आज प्रसादालय सुरू ठेवण्यात येईल. तसेच उद्या नास्ता पाकिटे सुरू राहतील असाही अंदाज आहे. संस्थानची रुग्णालये मात्र सुरू राहतील. या ठिकाणी रुग्णांव्यतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कठोर पावले उचलू शकते, केवळ ठराविक वेळीच बाहेरच्या लोकांना रुग्णांची भेट घेता येईल, सध्या रुग्णांना चोवीस तास भेटण्याची मुभा आहे.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी धार्मिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल केले होते. त्यानंतर संस्थानचे सीईओ अरुण डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, रमेश उगले, संरक्षण प्रमुख गंगावणे, आयटी प्रमुख अनिल शिंदे आदी उपस्थीत होते. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदी प्रमुख व्यक्तींशीही दुरध्वनीवरून विचारविनिमय करण्यात आली. या पार्श्वभूमीवर संस्थानने साथीचा फैलाव टाळण्याच्या दृष्टिकोनातून व भाविकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन सामाजिक भान जपत मंदिर पुढील निर्णय होईपर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेत आहे. गेल्या पंधरा दिवसात जगभरातील ३८ देशांतील ६२६ भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे. यात कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या चीन, इटली व स्पेनसह २१ देशातील २८६ भाविकांचा समावेश आहे.
गेल्या पंधरा दिवसात चीन (४), इटली (६), फ्रान्स(१), स्पेन(३), नेदरलॅन्ड(४), ऑस्ट्रेलिया(१०), स्वित्स्झरलॅन्ड(५), युनायटेड किंगडम(३९), युनायटेड स्टेट(१११) मधुुन आलेल्या विदेशी भाविकांनी साईदरबारी हजेरी लावली आहे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात चीन मधुन( ६), इटली (५), फ्रान्स (२), स्पेन(४), आॅस्टेलिया (५१७), युनायटेड किंगडम (१७८), युनायटेड स्टेटस (१६७६), दुबई( १०३), जर्मनी( ११५), युयेई (१३०), सिंगापुर( १६१) भाविक शिर्डीत येऊन गेले आहेत. लोकमतने आज विदेशी भाविकांची शिर्डीतील आकडेवारी समोर आणल्याने परिस्थीतीचे गांभीर्य वाढले होते.