पाथर्डी तालुक्यात ढगफुटी;शेतीचे नुकसान, रस्ते, पूल गेले वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 09:30 AM2020-07-31T09:30:00+5:302020-07-31T09:31:46+5:30
पाथर्डी ( जि. अहमदनगर) माणिकदौंडी परिसरात शुक्रवारी पहाटे एक वाजता झालेल्या मुसळधार पावसाने शेतीपिकांसह परिसरातील अमरापूर कर्जत रोड वरील रस्ते, पूल वाहून गेले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
हरिहर गर्जे

परिसरात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाल्याने पिके जोमात होती. परंतु शुक्रवारी पहाटे झालेल्या जोरदार पाऊसाने ओढे नाले ओसंडून वाहू लागले. त्यातच अमरापूर कर्जत महामार्गावरील रस्त्याचे व पुलाचे काम अर्धवट असल्याने रस्त्याच्या कामाकरता नदीपात्रात घातलेल्या मातीच्या मोठ्या भरावाने नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलून नदी काठच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले. यामुळे परिसरातील कापूस, बाजरी, मुग, भुईमूग आदी पिके पाण्याखाली जावून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
परिसरातील शेतकरी गेल्या पाच-सहा वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसत असताना अचानक झालेल्या ढगफुटीने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे आणि पीक विमा लागू करावा, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांतून होत आहे.