अकोल्याच्या मधाला क्लस्टरची गोडी
By Admin | Published: May 14, 2014 11:23 PM2014-05-14T23:23:17+5:302023-10-21T20:37:50+5:30
जिल्ह्यातील विविध प्रक्रिया उद्योगांना गती मिळण्याची चिन्हे आहेत़
अहमदनगर: जिल्ह्यातील विविध प्रक्रिया उद्योगांना गती मिळण्याची चिन्हे आहेत़ पालकमंत्र्यांच्या अकोले तालुक्यात उत्पादित केल्या जाणार्या मधावर प्रक्रिया करण्यासाठी क्लस्टर उभारण्यात येत असून, मध उत्पादकांचा गट स्थापन करण्यात आला आहे़ त्यामुळे अकोल्याच्या मधाला वेगळीच चव येणार आहे़ उद्योगांना चालना मिळावी, यासाठी केंद्र शासनाने क्लस्टर योजना आणली़ इतर शहरात क्लस्टर कधीच सुरू झाले़ क्लस्टरच्या माध्यमातून नवनवे तंत्रज्ञान तिथे पोहोचले आहे़ औद्योगिक विकासाला यामुळे गती मिळाली़ नगर मात्र त्यास अपवाद होते़ सुरुवातीला क्लस्टरला शून्य प्रतिसाद होता़ उशिरा का होईना पण नगरच्या उद्योजकांना क्लस्टरचे महत्व समजले़ अॅटो इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारे उद्योजक एकत्र आले व त्यांनी क्लस्टरसाठी प्रस्ताव पाठविला़ त्यास केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखविला़ नागापूर येथील औद्योगिक वसाहतीत क्लस्टरच्या इमारतीचे काम सुरू आहे़ जिल्ह्यात प्रथमच हा प्रकल्प सुरू होत आहे़ या धर्तीवर केंद्राने तालुकास्तरावरही हा प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ त्यानुसार जिल्हा उद्योग केंद्राच्या अधिकार्यांनी अकोले तालुक्यात चाचपणी केली़ अकोले तालुक्यात मोठ्याप्रमाणात मधाचे उत्पादन होते़ मधाचे उत्पादन करणार्या २० उत्पादकांचा गट स्थापन करण्यात आला आहे़ त्यांनी या उपक्रमास प्रतिसाद दिला़ या उत्पादक समूहासाठी हे क्लस्टर उभारले जाणार आहे़ जिल्ह्यात विविध वस्तुंचे उत्पादन केले जाते़ मात्र त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग बोटावर मोजण्याइतकेच आहेत़ प्रक्रिया करणे खर्चिक बाब आहे़ ते सामान्यांच्या आवाक्या पलीकडचे आहे़ यंत्राच्या किमतीही भरमसाठ आहेत़ ती विकत घेणे शक्य नाही़ प्रक्रिया करणे शक्य व्हावे,यासाठी क्लस्टर हा पर्याय समोर आला़ एकाच वस्तुचे उत्पादन करणारा समूह एकत्र आल्यास त्यांना ही यंत्रणा मोफत पुरविली जाते़ जागा व इमारत उभारणे उत्पादकांवर बंधनकारक आहे़ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मशिनरी पुरविली जाणार आहे़ अकोले तालुक्यात मोठ्याप्रमाणात मधाचे उत्पादन केले जाते़ त्यावर क्लस्टरमध्ये प्रक्रिया करून विक्री केली जाणार असल्याचे सांगण्यात आले़ प्रत्येक तालुक्यात क्लस्टर उभारण्याचे प्रस्तावित आहे़ विविध तालुक्यात चाचपणी सुरू आहे़ अकोले तालुक्यातील मध उत्पादकांसाठी क्लस्टर उभारणे शक्य असून, मधावर प्रक्रिया करणारे क्लस्टर उभारण्यात येणार आहे़ - एस. एस. गवळी, व्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, नगर.