शेतक-याचे सहकुटूंब उपोषण : शेतात जाण्यासाठी रस्ता खुला करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 06:55 PM2018-05-22T18:55:52+5:302018-05-22T18:59:09+5:30
शेतात जाण्यासाठी बांधावरून गाडीरस्ता बंदोबस्तात करून देण्याचा आदेश असताना तहसीलदारांचे प्रतिनिधी रस्ता खुला न करता निघून गेले.
जामखेड : शेतात जाण्यासाठी बांधावरून गाडीरस्ता बंदोबस्तात करून देण्याचा आदेश असताना तहसीलदारांचे प्रतिनिधी रस्ता खुला न करता निघून गेले. त्यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी, तसेच जेसीबी व ट्रॅक्टरसाठी खर्च झालेल्या रकमेचा निष्कारण भुर्दंड सोसावा लागल्याने हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी वयोवृद्ध शेतकरी कुटुंबासह तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
पोपट माणिक तागड (वय ६५ रा.खुटेवाडी, मुंजेवाडी ग्रा. पं.) यांची खुटेवाडी शिवारात गट क्रमांक ७५ मध्ये शेतजमीन आहे. शेती वहीत करण्यासाठी त्यांना वडिलोपार्जीत जमीन गट क्रमांक ८० मधून जावे लागते. परंतु शेजारील शिवाजी तागड हे जमिनीतून जाऊ देत नसल्याने पोपट तागड यांनी तहसीलदारांकडे २०११ मध्ये तक्रार केली होती. तत्कालीन तहसीलदारांनी १२ मार्च २०१२ रोजी गट क्रमांक ७६ मधून दक्षिण बांधाने गाडी रस्ता खुला करून देण्याचा आदेश दिला.
तहसीलदारांच्या आदेशाला प्रतिवादी शिवाजी तागड यांनी कर्जतच्या प्रांताधिका-यांकडे अपील दाखल केले. तत्कालीन प्रांताधिका-यांनी २०१६ रोजी शिवाजी तागड यांचे अपील फेटाळून जामखेड तहसीलदारांनी दिलेला आदेश कायम ठेवला होता. २०१६ रोजी शिवाजी तागड यांनी अप्पर जिल्हाधिका-यांकडे अपील दाखल केले होते. १५ मे २०१७ रोजी अप्पर जिल्हाधिका-यांनी पात्रतेच्या मुद्यावर अपील फेटाळले. न्याय न मिळाल्याने त्यांनी तहसीलदारांना २ मे रोजी निवेदन देऊन २२ मे रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तहसीलदारांनी दखल न घेतल्यामुळे पोपट तागड कुटुंबीयांसह उपोषणास बसले आहेत.
तहसीलदार, प्रांत, अप्पर जिल्हाधिकारी असा सहा वर्षांचा कोर्टकचेरी प्रवास केल्यानंतर वयोवृद्ध शेतकरी पोपट तागड यांनी तहसीलदार विजय भंडारी यांच्याकडे रस्ता खुला करण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. तहसीलदारांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मोहन कुमटकर यांची नियुक्ती केली. संबधित शेतक-याने पोलीस बंदोबस्तासाठी ५ हजार ५२५ रूपये भरले. रस्ता तयार करण्यासाठी एक जेसीबी मशीन व ६ ट्रॅक्टरसाठी ३० हजार रूपये शेतक-यांनी दिले. १६ एप्रिल २०१८ रोजी तहसीलचे प्रतिनिधी मोहन कुमटकर आले, पण रस्ता खुला करून देता निघून गेले. त्यामुळे शेतकरी पोपट तागड यांचा ३५ हजार रुपयांपर्यंतचा खर्च विनाकारण वाया गेला.