कर्जत-जामखेडला पुन्हा सहकारी साखर कारखाना; मुख्यमंत्र्यांची घोषणा, मतदारसंघाच्या अपेक्षा उंचावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 01:36 PM2019-10-14T13:36:05+5:302019-10-14T13:36:33+5:30
कर्जत-जामखेडला पुन्हा मंत्रिपद मिळेल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याला मंजुरी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केल्याने प्रचारात रंगत भरली गेली आहे. मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होण्याची चर्चा यामुळे पुन्हा सुरु झाली आहे.
विश्लेषण - अशोक निमोणकर ।
जामखेड : कर्जत-जामखेडला पुन्हा मंत्रिपद मिळेल ही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याला मंजुरी देण्याचे सूतोवाचही त्यांनी केल्याने प्रचारात रंगत भरली गेली आहे. मतदारसंघात सहकारी साखर कारखान्याची निर्मिती होण्याची चर्चा यामुळे पुन्हा सुरु झाली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघ मुळातच दुष्काळी पट्ट्यात आहे. त्यामुळे मोठे उद्योग व कारखाने नाहीत. अशा परिस्थितीत जनता दलाच्या नेत्या रंजना पाटील यांनी सहकार तत्वावरील साखर कारखाना काढण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. नंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी जामखेड तालुक्यात सहकारी साखर कारखाना काढण्यासाठी प्रयत्न केला पण, तोही सफल झाला नाही. कर्जत तालुक्यात आबासाहेब निंबाळकर, बापूसाहेब देशमुख, भालचंद्र पाटील, आनंदराव फाळके यांनी जगदंबा सहकारी साखर कारखाना काढला. परंतु पुढे तो कर्जबाजारी होऊन लिलावात निघाला. हा कारखाना अवघ्या १९ कोटीच्या लिलावात खासगी तत्वावर विकला गेला. तोच अंबालिका म्हणून पुढे आला.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी हळगाव येथे खाजगी कारखाना उभारला. परंतु काही दिवसांनी त्यांनी तो विकला. भीमापट्ट्यात व उजनी फुगवट्यातील पाण्यामुळे या भागात उसाचा पट्टा आहे. तसेच तालुक्यातील खैरी प्रकल्प व काही पाझर तलाव या ठिकाणी उसाचे क्षेत्र आहे. खासगी कारखाना चालतो. मात्र, सहकाराला यश आले नाही.
मतदारसंघातील शेतक-यांची ऊस देताना अडवणूक होऊ नये म्हणून सहकारी तत्वावरील साखर कारखाना काढण्याची घोषणा पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचारात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यास मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. नुकतीच सहकारी तत्वावरील सूतगिरणीला सरकारने मंजुरी दिली आहे. त्यापाठोपाठ कारखान्याबाबत भाष्य करण्यात आले आहे.
या मतदारसंघात राम शिंदे व रोहित पवार यांच्यात चुरस आहे. पवार यांच्याकडे खासगी कारखाना आहे. त्याला पर्याय म्हणून शिंदे यांनी सहकारी साखर कारखाना काढण्याची घोषणा केली आहे. कारखाना निर्मितीचा हा मुद्दा प्रचारात कळीचा बनला आहे.