समन्वयवादी दादासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 03:54 PM2019-08-18T15:54:33+5:302019-08-18T15:54:42+5:30

जाती निर्मूलनासाठी त्यांच्या मुलांनी जातीबाहेरच्या मुला-मुलींबरोबर ठरविलेल्या विवाहांना दादासाहेबांनी उघडपणे मान्यता दिली. त्यांचे कुटुंब म्हणजे विविध जातीधर्मातील जावई-मुली, सुना-मुले यांचे अभिनव संमेलनच होय. अशाप्रकारे त्यांनी कुटुंबात बाबासाहेबांचे स्वप्न साकार करून कुटुंबमर्यादेत जातीअंताचा लढा जिंकला.

Co-ordinate Dadasaheb | समन्वयवादी दादासाहेब

समन्वयवादी दादासाहेब

अहमदनगर : समाजाच्या दु:खाशी नाती सांगणाºयांना शतकांची कुंपनदेखील अडवू शकत नाहीत. वाल्मिकीच्या शोकाचा श्लोक झाला. गळ्यात अडकलेल्या हुंदक्याची होते गझल! तसेच महाराष्टÑाचं नेतृत्व करणाºया व विशेषत: नगर जिल्ह्यातून उदयास आलेल्या काही आदरणीय नेत्यांबद्दल म्हणता येईल. काळाच्या पडद्याआड जाऊनही त्यांच्या स्मृतीचं आजही जागरण करावंसं वाटतं. काळाचं कुंपण त्यांना अडवू शकत नाही. अशा नेत्यांपैकीच कालकथित दादासाहेब रूपवते यांची गणना करता येईल.
अकोल्यासारख्या छोट्या गावात तथा दलित समाजात  जन्मलेला एक मुलगा भविष्यात महाराष्टÑात नेतृत्व करेल, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात खूप मोठं नाव कमावेल व दिल्ली दरबारापर्यंत आपल्या नेतृत्वाचा वेगळा ठसा उमटवेल, हे स्वप्न त्यावेळी कोणी पाहिलंही नसेल. कोणी तसं म्हटलं असतं तर लोकांनी त्याला वेड्यात काढलं असतं. पण एखाद्या खडकावरही गुलाब उमलू शकतो, याचं प्रत्यंतर दादासाहेबांच्या रूपानं आलं. याचा सार्थ अभिमान अकोलेकरांना वाटणं स्वाभाविक आहे. त्यांचं बालपण अकोल्याच्या मातीनं पाहिलं व या बुद्धिमान बालकाला या मातीनंच जगण्याचं बळ दिलं. अकोले येथील प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी ते नाशिकला आणि नंतरच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या लढ्यापर्यंत पोहोचावे म्हणून उच्च शिक्षणासाठी मुंबई शहरात गेले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने उदरनिर्वाहासाठी त्यांनी काही काळ अकोले येथेच मॉडर्न हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून अध्यापन केले. एका पवित्र अशा पेशाने त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘आॅल ग्रेट मेन वेअर टिचर्स’ याची प्रचिती ते खºया अर्थाने ग्रेट झाल्यानंतर आम्हाला आली.
या शिक्षकाने शिक्षणाचे महत्त्व त्याचवेळी ओळखल्याने व शिक्षण ही परिवर्तनाची किल्ली आहे, याची प्रचिती आल्याने त्याची जाणीव ठेवून अकोले येथे १९७२ च्या दुष्काळात अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेचे पदवीपर्यंतचे  शिक्षण देणारे महाविद्यालय त्यांनी सुरू केले. ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ हा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मंत्र त्यांनी प्रत्यक्षात अंमलात आणला. गरिबी दूर करायची असेल व प्रगती करायची असेल तर समाजाला अगोदर अज्ञानरेषेच्या वर आणले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. अज्ञान दूर झाल्यावर म्हणजेच शिक्षण घेतल्यानंतरच समाज दारिद्र्यरेषेच्यावर येऊ शकतो, असा त्यांचा विश्वास होता व स्वत:च्या उदाहरणाने त्यांनी तो सिद्ध केला होता. त्यांनी सुरू केलेल्या महाविद्यालयात आम्हाला अध्यापन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या सहवासातील अमृताचे काही क्षण आम्हाला वेचता आले, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो.
अतिशय बिकट अशा परिस्थितीत दादासाहेबांनी उच्च शिक्षण घेऊन त्या काळात उच्चविद्याविभूषित होण्याचा बहुमान मिळविला़ डॉ. आंबेडकरांच्या सहवासाचा त्यांना मोठाच लाभ झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दादासाहेबांनी निरनिराळ्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांचा व्यासंग दांडगा होता. ‘बहुजन हिताय! बहुजन सुखाय!!’ असा नारा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेल्या ‘प्रबुद्ध भारत’ या साप्ताहिक मुखपत्राचे अनेक वर्ष ते संपादक होते. त्यांचा व्यासंग, अफाट वाचन, इंग्रजीवरील प्रभुत्व, जोडीला विनोदाची खुमासदार फोडणी दिलेले व किस्स्यांची पेरणी केलेले प्रबोधनपर वक्तृत्व ही त्यांची खासियत होती. दादासाहेबांना ऐकणे म्हणजे एक पर्वणीच असायची. श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे, खळखळून हसायचे व प्रबोधनाची शिदोरी बरोबर घेऊन जायचे.
त्यांनी काही काळ वकिलीही केली. इतक्या उच्चविद्याविभूषित असलेल्या व्यक्तीला लठ्ठ पगाराची नोकरी सहज कोठेही मिळाली असती. वकिलीतही ते खोºयाने पैसे मिळवू शकले असते. परंतु त्यांनी तो सुखाचा, उत्कर्षाचा आणि ऐषारामी वैभवाचा रस्ता सोडून दीन-दुबळ्यांसाठी लढण्याचा काटेरी आणि क्लेशदायक असा ध्येयवादाचा मार्ग स्वीकारला. आयुष्यभर ते दलित आणि दीन-दुबळ्यांसाठी अविरतपणे लढत राहिले. त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांचे अनेकजण साक्षीदार आहेत. बहुजन समाजातील हे साक्षीदार सांगतात की, दादासाहेबांची भ्रमंती खेड्यापाड्यात चालू असायची. पायी, बैलगाडीत, क्वचित प्रसंगी सायकलवर भ्रमंती करून ते लोकांशी संवाद साधायचे. जातीभेदाचा समाजाला शाप होता, अशा शापित जगाचे ते नागरिक होते. बहुदा त्यांचे स्वागत गावकुसाबाहेरच्या दलित आणि दीन-दुबळ्यावस्तीतच व्हायचे. अशा दीन-दुबळ्यांचे प्रबोधन करून आपल्या हक्कांविषयी ते जागृत करायचे. उन्हात, वाºयात, थंडीत, पावसात प्रसंगी उपाशीतापाशी त्यांची भ्रमंती अखंड चालूच रहायची. नंतरच्या काळात परिस्थिती 
बदलली. मात्र भ्रमंती चालूच होती. 
गतीशी जुळवून घेण्यासाठी सायकलीची जागा चारचाकीने घेतली. वय वाढल्यानंतरही समाजसेवेचे व्रत चालूच होते.
एका समारंभात ते प्रमुख पाहुणे असताना ‘उपस्थित तरुण तुर्क व म्हातारे अर्क’ असा उल्लेख मी सूत्रसंचालनात केला. समारंभ संपल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलावले आणि म्हणाले, ‘‘ए, कोणाला म्हातारा अर्क म्हणतो? अरे मी मरेन, पण म्हातारा होणार नाही’’ आणि वास्तवात समाजकार्य करताना ते अखेरपर्यंत ताजेतवाने व तरुणच राहिले.
एकूणच परिवर्तन करायचे असेल तर राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केल्यास परिवर्तन सहजसुलभ होईल, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय सुसंस्कृत होते. विचार-आचाराने संपन्न आणि समृद्ध लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी त्यांची विचारसरणी होती. सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुकीसाठी ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून नगर-उत्तर मतदारसंघातून उभे राहिले. ते निवडून आले नाहीत, मात्र सक्रिय राजकारणात त्यांचा प्रवेश झाला व यथावकाश काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला. मध्यममार्गी पक्ष म्हणून कदाचित त्यांनी काँग्रेसचीच निवड केली असावी.
त्यांची राजकीय सभेतील भाषणेही अतिशय अभ्यासपूर्ण व प्रभावी असायची. विद्वत्तापूर्ण भाषण करतानाच सर्वसामान्यांना समजेल, अशा भाषेत ते संवाद साधायचे आणि विनोद, किस्से व ग्रामीण म्हणींचा वापर करून सभा जिंकायचे. शुगरकोट करून प्रबोधनाची गोळी ते श्रोत्यांना द्यायचे. परिणामी त्यांचा विचार मेंदू नावाच्या निसर्गाने बनवलेल्या कॉम्प्युटरमध्ये सहजगत्या फिड व्हायचा व कधीही डिलीट होणार नाही, अशा पद्धतीने सेव्ह व्हायचा.
महाराष्टÑाचे त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दादासाहेबांच्या विचारांची, कार्याची व त्यागी व्यक्तिमत्त्वाची पारख होती. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना विनंती करून त्यांनी वाईच्या विश्वकोष कार्यालयात दादासाहेबांना काम देऊन मानधन देण्याचे सुचविले. पुणे येथे रेल्वे स्टेशनजवळ आगरकरनगरमध्ये त्यांना राहण्याची जागा उपलब्ध करून दिली. विश्वकोषात ते कामही करू लागले. 
तथापि, दीन-दुबळ्या व दलित जनतेचा संपर्क त्यांनी सोडला नाही. प्रचारकार्याची धडपड चालू ठेवली. रात्रीचा दिवस करून 
आपले कार्य अखंडपणे चालू ठेवले. पत्नी व मुलेबाळे पुण्याला असत. परिवार मोठा. त्यांच्या पत्नी सुशिलाबाई या खºया अर्थाने सुशिल.  दादासाहेबांना त्यांच्या अंगीकृत कार्यात 
मनापासून त्यांनी साथ दिली. प्रतिकूल परिस्थिती अतिशय कौशल्याने व धीराने सुशिलाबार्इंनी हाताळली.
आणीबाणीनंतर १९७७ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. इंदिरा काँग्रेसमध्ये फूट पडून इंदिरा काँग्रेस व रेड्डी काँग्रेस असे दोन पक्ष निर्माण झाले. नंतरच्या काळात दोन्ही काँग्रेसने महाराष्टÑात एकत्र येऊन सरकार स्थापन केले. मात्र पुढे ते फार काळ टिकले नाही. शरद पवार व त्यांच्या सहकारी मित्रांनी त्या काळात काँग्रेस पक्षातून बाहेर पडून समाजवादी काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. दादासाहेब रूपवते या पक्षाचे अध्यक्ष होते़ समाजवादी काँग्रेस पक्षाला लोक विनोदाने ‘दा़ रू़ काँग्रेस’ (दादासाहेब रूपवते यांच्या नावाचे लघुरुप) संबोधायचे. दादासाहेबांच्या नावाने तो पक्ष ओळखला जायचा.
दादासाहेबांनी फुले-आंबेडकरांचा विचार फक्त सांगितलाच नाही, तर प्रत्यक्ष कुटुंबात अंमलात आणला. जाती निर्मूलनासाठी त्यांच्या मुलांनी जातीबाहेरच्या मुला-मुलींबरोबर ठरविलेल्या विवाहांना दादासाहेबांनी उघडपणे मान्यता दिली. त्यांचे कुटुंब म्हणजे विविध जातीधर्मातील जावई-मुली, सुना-मुले यांचे अभिनव संमेलनच होय. अशाप्रकारे त्यांनी कुटुंबात बाबासाहेबांचे स्वप्न साकार करून कुटुंबमर्यादेत जातीअंताचा लढा जिंकला व ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ हा संत-विचार सार्थ  केला.
शैक्षणिक संस्था व सांस्कृतिक संस्था स्थापन करून अनेक गोरगरीब व दलित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग त्यांनी खुला केला. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे ते प्रमुख विश्वस्त होते. तसेच बहुजन शिक्षण संघाचीदेखील त्यांनी स्थापना केली. प्रवरा नदीवर बांधल्या गेलेल्या पुलाच्या योगदानात ते पुढे होते. १९९१ साली उभ्या राहिलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे ते पहिले चेअरमन होते. त्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. १९६२ साली तालुक्यातील तमाम दलित जनतेला एकत्र करून दादासाहेबांनी धम्मयात्रा भरविण्याचे अत्यंत मोठे कार्य केले. अहमदनगर जिल्हा स्कूल बोर्डाच्या अध्यक्षपदापासून ते महाराष्टÑ मंत्रिमंडळात समाजकल्याण व गृहनिर्माण, सांस्कृतिक खात्याचे मंत्री या नात्याने त्यांनी भरीव कामगिरी केली. त्यांनी शाहीर, तमासगीर, लावणीकार व जलसाकार यांना आश्रय व प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांची संघटित चळवळ उभारली. बौद्ध धम्माच्या चळवळीत जागतिक पातळीवर त्यांनी योगदान दिले.
त्यांच्या उत्स्फूर्त भाषणात एक खुमासदार किस्सा सांगितल्याविना हा लेख पूर्ण होईल, असे वाटत नाही. त्याचे झाले असे : सहकारी चळवळीतील ज्येष्ठ पुढारी कै. भाऊसाहेब थोरात यांचा षष्ठ्यब्दी समारंभ होता. या समारंभाचे साक्षीदार होण्यासाठी आम्हीही संगमनेरला गेलो होतो. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, अण्णासाहेब शिंदे असे मातब्बर नेते व इतरही महत्त्वाचे पुढारी समारंभास उपस्थित होते. जनसमुदाय अफाट होता. दादासाहेब बोलायला उठले आणि म्हणाले, ‘‘जोहार मायबाप जोहार, असे म्हणत जगावे लागलेल्या दलित समाजाचा मी प्रतिनिधी.
 भाऊसाहेब थोरात, बाळासाहेब विखे पाटील, अण्णासाहेब शिंदे हे आमचा जोहार घेणाºया मंडळीतले. प्रवरा नदीच्या काठावर अकोले माझे गाव. त्या नदीच्या खाली भाऊसाहेबांचे गाव. त्याच्या खाली बाळासाहेब विखे पाटील यांचे गाव व त्याही पुढे श्रीरामपूरला अण्णासाहेब शिंदे. हे सर्वजण माझ्या पाणवठ्याचे उष्टे पाणी पितात.’’ चव्हाण साहेबांसह सभेतील सर्वजण हास्यकल्लोळात बुडाले़ उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या या विधानाला दाद दिली. वरवर विनोदी वाटणारे हे वक्तव्य जातीअंतावर प्रकाश टाकणारे होते, हे केवळ जाणकारच जाणू शकतील़
दादासाहेब सर्वसामान्यांसाठी अविश्रांतपणे लढत राहिले़ झगडत राहिले. दमा, मधुमेह, रक्तदाब, डोळ्यांच्या विकारांना जणू मित्र करून शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या प्रबोधनातून व प्रत्यक्ष कृतीतून कार्यरत राहिले. ‘‘शेवटचा दम मी तोडेन, तेव्हाच हा दमा माझ्याबरोबर संपेल. ‘आमचा प्याला दु:खाचा, डोळे मिटून प्यायाचा’ असे म्हणत दम्याला बरोबर घेऊनच मी मरणाला सामोरा जाईन’’ असे ते म्हणायचे. 

अष्टपैलू नेते
हाडाचा कार्यकर्ता, उत्तम प्रशासक, धोरणी व मुत्सद्दी नेता, प्रभावी वक्ता, परिवर्तनवादी संशोधक, समतेचा कर्मवीर आणि सच्चा फुले-शाहू-आंबेडकरवादी, संयमी, समन्वयवादी कार्यकर्ता असा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणाºया या अष्टपैलू नेत्याचे २३ जुलै १९९९ रोजी निर्वाण झाले. अलीकडेच त्यांचे थोरले चिरंजीव प्रेमानंद ऊर्फ बाबूजींचेही अकाली निधन झाले. बाबूजींच्या पश्चात दुर्दैवाने त्यांच्या पत्नी स्नेहजा यांचेही अपघाती निधन झाले. दादासाहेबांच्या हयातीत असे प्रसंग घडले असते तर ते असा दु:खाचा डोंगर कोसळल्यावर कोलमडूनच गेले असते. ते अत्यंत संवेदनशील होते. नियतीपुढे कोणाचेही काही चालत नाही. तिघांच्या स्मृतींना अभिवादन करताना शेवटी मी इतकेच म्हणेन की, ‘जगण्याच्या साºया वाटा मरणाच्या गावा जाती, नि:शब्दपणे या वाटा चालणेच आपल्या हाती.’

लेखक - नंदकुमार रासने, लेखक निवृत्त प्राध्यापक व अभ्यासक आहेत.

Web Title: Co-ordinate Dadasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.