मोबाइलच्या युगात क्वाइन बॉक्स इतिहासजमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:22 AM2021-03-09T04:22:36+5:302021-03-09T04:22:36+5:30
धामोरी : एकेकाळी बहुतांश ठिकाणी क्वाइन बॉक्सने सामान्य नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या दुकानावर क्वाइन बॉक्सची सुविधा ...
धामोरी : एकेकाळी बहुतांश ठिकाणी क्वाइन बॉक्सने सामान्य नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. जवळपास सर्वच छोट्या-मोठ्या दुकानावर क्वाइन बॉक्सची सुविधा उपलब्ध होती. दिवसेंदिवस मोबाइलचा वापर वाढला. तो प्रत्येकाच्या हातात आला. त्यामुळे क्वाइन बॉक्सचे महत्त्व कमी झाले. किंबहुना तो नाहीसा झाला. आता क्वाइन बॉक्स दिसेनासा झाला असल्याने तो इतिहास जमा झाल्याचे दिसत आहे.
संवाद साधण्यासाठी फोनची सुविधा घराघरात असायची. दरम्यान, कुठल्याही दुकानावर लाल, पिवळा, निळा अशा विविध रंगात क्वाइन बॉक्सचा डब्बा ठेवलेला असायचा. त्यात एक रुपया टाकून फोन लावून काही मर्यादित वेळेचा कॉल संपतात तोच सिग्नल द्यायचा. लगेच पुन्हा एक रुपया टाकून आपले संभाषण सुरू ठेवायचे, अशी पद्धत काही वर्षांपूर्वी होती. त्यात जमा होणाऱ्या रकमेतून फोनचे बिल भरून फोनधारकास काही पैसे शिल्लक राहायचे; मात्र कालांतराने ॲण्ड्रॉइड मोबाइल मोठ्या प्रमाणात जन्माला आले.
विविध कंपनींचे मोबाइल फोन विकत घेण्याची जणू चढाओढच पाहायला मिळाली. महागडे मोबाइल व सर्वसाधारण चायनामेड कमी किमतीत मोठ्या आवाजाचे मोबाइल काही दिवस पाहायला मिळाले. हे मोबाइल अनेकांकडे असल्याने मोबाइलधारकास आता क्वाइन बॉक्सची गरज राहिली नाही.
चालता-फिरता खिशात असणारा मोबाइल हवे तेव्हा उपयोगात यायला लागला. तेव्हा क्वाइन बॉक्स फोनची संख्या कमी व्हायला झाली. आता डिजिटल युग आले आहे. तेव्हा या मोबाइलच्या युगात क्वाइन बाॅक्स बासनात गुंडाळला गेला आहे.