जिल्हाधिका-यांनी आंदोलक ठेकेदारांना हुसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 07:11 PM2018-05-23T19:11:51+5:302018-05-23T19:19:16+5:30
महापालिकेच्या आवारात उपोषणास बसलेल्या ठेकेदारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या बाहेर हुसकावून लावले. इमारतीच्या आतील जागा आंदोलनाची नाही. आवारात आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते, असे खडे बोलही जिल्हाधिका-यांनी सुनावले.
अहमदनगर : महापालिकेच्या आवारात उपोषणास बसलेल्या ठेकेदारांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेच्या बाहेर हुसकावून लावले. इमारतीच्या आतील जागा आंदोलनाची नाही. आवारात आंदोलन सुरू असताना सुरक्षा रक्षक काय करीत होते, असे खडे बोलही जिल्हाधिका-यांनी सुनावले. त्यामुळे उपोषणार्थी ठेकेदारांना त्यांचे बस्तान रस्त्यावर हलवावे लागले. बिलांबाबत कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने ठेकेदारांचे बेमुदत आंदोलन सुरूच होते.
महापालिकेतील ठेकेदारांचे तब्बल २५ ते ३० कोटी थकलेले आहेत. त्यापैकी नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीतून केलेल्या कामांची अडीच ते तीन कोटी रुपयांची थकलेली देयके तत्काळ अदा करावीत, अशी ठेकेदारांची मागणी आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही बिले अदा न केल्याने ठेकेदार बुधवारी सकाळीच महापालिकेच्या आवारात उपोषणास बसले. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी हे महापालिकेतील कामकाज उरकून बाहेर निघाले असताना त्यांनी ठेकेदारांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. उपोषण करण्याची ही काही जागा नाही. तुमच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्याचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त संतोष धोंगडे यांना सांगितले आहे. तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. मी तुमच्याशी चर्चा करणार नाही. महापालिकेचे सुरक्षा रक्षक काय करीत आहेत? अशी विचारणा करीत त्यांनी सुरक्षा रक्षकाला बोलावून त्याचाही समाचार घेतला. आंदोलक महापालिकेत घुसतात आणि तुम्ही काय करता? अशा शब्दात खडसावल्यानंतर सुरक्षा रक्षकाची बोलती बंद झाली. आंदोलन करायचे असेल तर ते थेट महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर करा, अशा शब्दात जिल्हाधिका-यांनी ठेकेदारांना ठणकावले. त्यानंतर ठेकेदारांनी त्यांचे बस्तान थेट महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर हलविले.