राहीबाईंच्या देशी बियाणे बँकेत पोहोचले कलेक्टर; कृषी विभागाला आवाहन
By साहेबराव नरसाळे | Published: April 5, 2023 06:59 PM2023-04-05T18:59:20+5:302023-04-05T18:59:47+5:30
राहीबाईंचे ज्ञान कृषी विभागाने जनतेपर्यंत पोहोचविण्याचे सालीमठ यांचे आवाहन
अहमदनगर : पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या कोंभाळणे येथील देशातील पहिल्या देशी बियाणे बँकेला अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी भेट दिली. राहीबाई यांचे देशी बियाणेबाबतचे ज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी संगमनेर प्रांतधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे हे उपस्थित होते. देशी बियांच्या संवर्धनासाठी देश आणि विदेशात प्रसिद्ध असलेल्या बीजमाता राहीबाई पोपेरे यांची भेट घेऊन या विषयाची सविस्तर माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. पोपेरे यांनी जतन केलेल्या विविध वाणांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या संग्रही असलेले भाजीपाला बियांचे संचही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेट दिले. अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी अतिदुर्गम भागात अशा पद्धतीचे काम उभे राहिल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.