महात्मा गांधी यांचे विचार जपणारा संग्राहक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:28 AM2019-10-02T10:28:13+5:302019-10-02T10:30:11+5:30
महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ, महान होतेच पण त्यांचे विचार अनुकरणीय असेच आहेत. आज दीडशे वर्षानंतरही हा विचार जगात सर्वत्र जपला जातोय. गांधी विचार अंमलात आणून यशस्वी होता येते हे अनेक उदाहरणावरून आपणास पहावयास मिळते. हाच गांधींचा विचार पोस्टाच्या तिकिटांतून जपणारा अवलिया म्हणून सचिन डागा यांची ओळख आहे.
गांधी जयंती विशेष/ विनायक डिक्कर ।
अहमदनगर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान आपण सर्व जण जाणतोच. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सत्याग्रह, अनेक आंदोलने करून त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. महात्मा गांधी एक व्यक्ती म्हणून सर्वश्रेष्ठ, महान होतेच पण त्यांचे विचार अनुकरणीय असेच आहेत. आज दीडशे वर्षानंतरही हा विचार जगात सर्वत्र जपला जातोय. गांधी विचार अंमलात आणून यशस्वी होता येते हे अनेक उदाहरणावरून आपणास पहावयास मिळते. हाच गांधींचा विचार पोस्टाच्या तिकिटांतून जपणारा अवलिया म्हणून सचिन डागा यांची ओळख आहे.
व्यवसायाने स्थापत्य कॉन्ट्रॅक्टर असलेले डागा यांनी गांधीजींवरील भारतीय पोस्टाने प्रकाशित केलेली अनेक तिकिटे जतन केली आहेत. गांधीजींवर १९४८ साली प्रथमच चार तिकिटांचा संग्रह निघाला होता. तेव्हा त्याची किंमत दीड, साडेतीन आणि बारा आणे अशी होती. ते स्वतंत्र भारतातील पहिले तिकीट होते. केवळ भारतच नव्हे तर जगातील ४५-५० देशांनी गांधीजींच्या स्मृत्यर्थ पोस्ट तिकिटे काढली आहेत असे डागा म्हणाले. गांधीजींच्या चित्रांचा वापर करून भारतात पोस्ट कार्ड, आंतरदेशीय पत्र, पाकिटे निघाली आहेत. महान व्यक्तिमत्त्व म्हणून गांधीजींच्या तिकिटाला संग्राहकांच्या दृष्टीने महत्त्व आहे.
गांधीजींच्या जीवनातील अनेक घटनांवर पोस्टाने तिकिटे प्रकाशित केली आहेत. दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चंपारण सत्याग्रह, गांधी सहस्त्राब्दी पुरुष, सत्याग्रह की शतवार्षिकी, सांप्रदायिक सदभावना, चरखा, मिठाच्या सत्याग्रहाची ७५ वर्षे अशी अनेक दुर्मिळ तिकिटे डागा यांच्या संग्रहात आहेत. १९४२ च्या छोडो भारत स्वातंत्र्य आंदोलनाची ७५ वर्षे, गांधीजींच्या हातातील काठीची प्रतिमा असलेले वैशिष्ट्यपूर्ण तिकीट, खादी कपड्यावरील १०० रुपयाचे तिकीट, सुवर्ण मुलामा असलेले गांधीजींची प्रतिमा असलेले तिकीट डागा यांनी आत्मीयतेने जपले आहे.
७ जून १८९३ साली आफ्रिकेतील पीटरमारिटजबर्ग स्टेशनवर गांधीजींना वर्णद्वेषी वागणूक देण्यात आली होती. त्यांना प्रथमश्रेणी कंपार्टमेंटमधून बाहेर जाण्यास सांगितले होते. या घटनेचा परिणाम म्हणून त्यांनी वर्णद्वेषाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यलढ्याची बीजे इथून त्यांच्या मनात रूजली. या घटनेच्या सव्वाशे वर्षानिमित्त आणि नेल्सन मंडेला यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २०१८ साली भारत आणि आफ्रिका पोस्टाने विशेष तिकीट प्रकाशित केले होते हे दुर्मिळ तिकीट डागा यांच्या संग्रहात आहे.
२००२ साली नगर पेक्स पोस्ट तिकीट प्रदर्शन पाहून सचिन यांना तिकिटांची आवड निर्माण झाली. नगरचे पारगावकर काका, शब्बीर शेख, शशिकांत मुनोत, पोस्टाच्या पाखरे मॅडम यांनी संग्रह करताना त्यांना मार्गदर्शन, सहकार्य केले. भारतीय संस्थानिक राजांची तिकिटे आणि महसूल दस्तऐवज हा त्यांचा आवडीचा विषय आहे. गेल्या १५ वर्षांपासून पोस्टाची विविध विषयावर निघणारी सर्व तिकिटे, मिनिएचर शीट, शीटलेटस विशेष आवरण त्यांच्या संग्रहात आहेत.
तिकिटांसोबतच गांधीजींची प्रतिमा असलेली विशेष नाणी आणि नोटा यांचाही संग्रह डागा यांनी केला आहे. १९६९ साली गांधीजींवर चार नोटांचा संग्रह निघाला होता असे त्यांनी सांगितले. गांधीजींच्या आत्मकथेची दुर्मिळ प्रत, गांधीजींवरील विविध पुस्तके विशेषरूपाने जपली आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संग्रहाची विविध प्रदर्शने त्यांनी लावली आहेत. विद्यार्थ्यांना याविषयी ते मार्गदर्शन करतात. पोस्ट विभागानेही विविध पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
पोस्ट तिकिटातून संस्कृती, इतिहास समजतो नव्या पिढीने त्याचा अभ्यास करावा. जिज्ञासा वृत्तीने त्याची माहिती घ्यावी. यासाठी सहकार्य, मार्गदर्शन राहिल, असे सचिन डागा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.