जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारत भरला जेऊरचा आठवडे बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:34+5:302021-04-04T04:20:34+5:30

केडगाव : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. असे असतानाही त्यांचा आदेश ...

The Collector's order filled the Jeur's weekly market | जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारत भरला जेऊरचा आठवडे बाजार

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश झुगारत भरला जेऊरचा आठवडे बाजार

केडगाव : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. असे असतानाही त्यांचा आदेश झुगारत शनिवारी जेऊर (ता. नगर) येथील आठवडे बाजार भरला होता. येथे विक्रेते, बाजारकरूंचीही गर्दी झाली होती. मात्र पोलीस येताच बाजारकरूंची पांगापांग झाली.

शनिवारी जेऊर येथील आठवडे बाजार असतो. जेऊरचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये घेण्यात आला होता. परंतु, त्या निर्णयाला काही सदस्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी विरोध केल्याने बाजार पूर्ववत भरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

जेऊरचा आठवडे बाजार गावातील सीना नदी पात्रात भरत असतो. बाजार बंदचा आदेश असल्याने बाजार सीना नदी पात्रात न भरता महावितरण कंपनीच्या चौकात भरला. बाजारात व्यापारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बाजार भरल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना समजल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल रमेश थोरवे व पोलीस नाईक दीपक गांगर्डे यांनी बाजारकरूंना समज देत हटविले. परत गर्दी न करण्याची ताकीद दिली.

--

नगर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रत्येक नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. बाजार बंद असल्याने व्यापारी व शेतकऱ्यांची अडचणी होत आहे. असे असले तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गर्दी न करता भाजीपाला विक्री करावी.

-भीमराज मोकाटे,

सरपंच, इमामपूर

---

ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर वापरावे, सामाजिक आंतर राखणे गरजेचे आहे. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

- योगेश कर्डिले,

प्राथमिक आरोग्य केंद्र, जेऊर

--

०३ जेऊर बाजार

जेऊर येथे शनिवारी भरलेला बाजार.

Web Title: The Collector's order filled the Jeur's weekly market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.