जिल्हाधिकारी यांची सिद्धटेक भेट; विकासकामांची पाहणी
By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:26+5:302020-12-05T04:33:26+5:30
सिद्धटेक : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी रात्री सिद्धटेक (ता. कर्जत) येथे भेट दिली. येथील विकासकामांची दोन तास ...
सिद्धटेक : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंगळवारी रात्री सिद्धटेक (ता. कर्जत) येथे भेट दिली. येथील विकासकामांची दोन तास पाहणी केल्यानंतर बुधवारी कर्जत येथे अधिकाऱ्यांसोबत विकास आराखडा बैठक घेऊन सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सिद्धिविनायक दर्शन घेतल्यानंतर येथील विश्रामगृह, भक्तनिवास, प्रसादालय, दर्शन बारी, दर्शन मंडप या कामांची पाहणी केली. दर्शनबारीमध्ये असणारे खड्डे, लोखंडी रॉड, प्रसादालयाच्या दुरुस्तीनंतरचे उडालेले छत, निविदेअभावी तीन वर्षांपासून बंद असलेले भक्त निवास यांची पाहणी केली. प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष असल्याने जिल्हाधिकारी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देताना अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडत होती.
‘लोकमत’ने निकृष्ट कामांच्या चौकशीसाठी वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गोविंद दानेज यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल येऊन दोषींवर मात्र काहीच कारवाई झाली नाही.
२००८ साली विकास आराखड्यास मंजुरी मिळाली. तेव्हापासून कोट्यवधींची विकासकामे झाली. मात्र, मूळ विकास आराखडा प्रत प्रशासनाकडे नाही. ती प्रथमेश शुक्ल यांनी जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करून दिली. याअगोदर त्यांनी आमदार रोहित पवार यांनाही प्रत दिली आहे.