विजेच्या धक्क्याने महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; महावितरणचा हलगर्जीपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 01:42 PM2019-11-04T13:42:32+5:302019-11-04T13:43:10+5:30
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सारोळा सोमवंशी येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा रविवारी (दि.३) सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या धक्क्याने निधन झाले.
विसापूर : महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सारोळा सोमवंशी (ता. श्रीगोंदा) येथील एका महाविद्यालयीन तरुणाचा रविवारी (दि.३) सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या धक्क्याने निधन झाले. तो विसापूर येथील सरस्वती विद्यालयात अकरावीच्या शास्त्र शाखेत शिक्षण घेत होता.
संदेश अनिल आढाव (वय १६, रा. सारोळा सोमवंशी) असे त्याचे नाव आहे. सारोळा सोमवंशी येथे नवलेवस्तीजवळ पंधरा दिवसांपासून एक वीज वाहक खांब जमिनीवर पडलेला होता. तरीही त्यातून विद्युत प्रवाह चालू होता. याची माहिती ग्रामस्थांनी महावितरणच्या कर्मचाºयांना वारंवार दिली होती. तरीही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
रविवारी सायंकाळी संदेश जनावरांना चारा घेऊन येत असताना चिखलात पाय घसरून विजेच्या तारेवर पडला. जमिनीवर पडलेल्या तारेला विद्युत प्रवाह चालू असल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्याबरोबर त्याची बहीण व आई होती. त्याच्या बहीणीने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला. तिलाही विजेचा किरकोळ धक्का बसला. त्यांच्या आईने जवळ असलेल्या कपड्याच्या सहाय्याने त्यांना बाजूला केले. मात्र त्याचा मृत्यू झाला.
दहा-बारा दिवसांपूर्वी सारोळा सोमवंशी येथे नवलेवस्ती जवळ पावसामुळे विजेचा खांब, तारा जमिनीवर पडल्या आहेत. ज्या ठिकाणी तारा पडल्या त्या ठिकाणी पावसामुळे मजूरांना जाणे शक्य नव्हते. त्यामुळे ते दुरुस्तीचे काम करता आले नाही. मात्र त्या ठिकाणचा विद्युत प्रवाह तत्काळ खंडित करण्यात आला होता. मात्र रविवारी अचानक कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने वीज प्रवाह जोडला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली आहे, असे कोळगाव येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता दीपक सिंग यांनी सांगितले.