‘साकळाई’च्या सर्व्हेचा निघाला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:36 PM2019-09-04T18:36:41+5:302019-09-04T18:38:02+5:30
साकळाई उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्व्हेक्षण होवून योजनेचा समावेश ‘सुप्रमा’ध्ये करण्यातबाबतचा आदेश मंगळवारी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिला आहे.
अहमदनगर : नगर-श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी भागातील ३५ गावांना वरदान ठरणा-या साकळाई उपसा सिंचन योजनेचे तातडीने सर्व्हेक्षण होवून योजनेचा समावेश ‘सुप्रमा’ध्ये करण्यातबाबतचा आदेश मंगळवारी कुकडी सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांना दिला आहे. याबाबत मंगळवारी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन, साकळाई कृती समिती सदस्य, अभिनेत्री दीपाली सय्यद यांची बैठक झाली.
गेल्या वर्षभरापासून साकळाई उपसा सिंचन योजना मार्गी लागावी यासाठी योजनेतील लाभधारक शेतक-यांनी लढा उभारला आहे. त्यासाठी गावोगावी जावून जनजागृती अभियान राबविले. ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले. लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकीमध्ये जाहीर सभेत विधानसभा निवडणुकीपूर्वी साकळाई उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले होते. लोकसभा निकालानंतरही साकळाईबाबत सरकारस्तरावर हालचाली न झाल्याने साकळाई कृती समिती व अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पुन्हा गावोगावी जावून जनजागृती अभियान राबविले. दरम्यान क्रांती दिनी जिल्हा परिषदेच्या आवारात अभिनेत्री सय्यद यांनी आमरण उपोषण केले. साकळाई योजनेबाबत मंत्रालयात बैठक घेवून मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. मंगळवारी (दि.३)पुन्हा मंत्रालयात गिरीष महाजन यांनी अभिनेत्री सय्यद व साकळाई कृती समितीचे सदस्य यांची बैठक घेतली. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठीचा प्रस्ताव महामंडळाकडून शासनास सादर करण्यात आला होता. बैठकीत मंत्र्यांनी पाणी उपलब्धतेच्या अधीन राहून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. सर्वेक्षणाला २.३४ कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये समांतर पाईपलाईनचे सर्वेक्षण व संकल्पन करणे, मुख्य रायझींग मेन, पंप हाऊस व लाभक्षेत्राचे सर्वेक्षण करण्यासाठीच्या बाबींचा समावेश आहे.
पाणी उपलब्ध झाल्यासच साकळाईचा विचार
२९ आॅगस्ट रोजी मंत्रालयातील नियामक मंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या चर्चेनुसार दुस-या कृष्णा पाणी तंटा लवादानुसार कुकडी खो-यामध्ये अतिरिक्त तीन टीएमसी पाण्याची तरतूद आहे. मात्र लवादाचा अंतिम निवाडा झालेला नाही. हे पाणी उपलब्ध झाले, तर या अतिरिक्त पाण्याचा वापर साकळाई प्रकल्पासाठी करता येईल, अशी चर्चा झाली. कुकडी डाव्या कालव्याला समांतर पाईपलाईनद्वारे अथवा एक्सप्रेस कॅनॉलद्वारे विसापूर धरणात पाणी आणणे.कुकडी घोड नदीमधून पावसाळ्यामध्ये घोड धरण (चिंचणी) येथे सोडणे. ते पाणी घोड धरणातून नदीपात्रात विसापूरसाठी, साकळाईसाठी उचलणे, अशा बाबींवर चर्चा झाली.