बागायती पट्ट्यात कपाशी लागवडीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:19 AM2021-05-24T04:19:45+5:302021-05-24T04:19:45+5:30
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागप्रमुख रवींद्र आंधळे यांनी मात्र, १० जूननंतर कपाशीची लागवड करा, असे आवाहन ...
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हवामान विभागप्रमुख रवींद्र आंधळे यांनी मात्र, १० जूननंतर कपाशीची लागवड करा, असे आवाहन केले आहे.
यंदा मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उन्हाची तीव्रता आहे. बागायती भागात शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागवड करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी कपाशीचे बियाणे उतरले आहे. शेतकऱ्यांनी दोन पाणी कपाशीला दिले आहे. दुसऱ्या बाजूला काही शेतकरी व तज्ज्ञ यांनी सध्या लागवड करू नये, असे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात लागवड केल्यास कपाशीच्या पिकात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला लागवडीचा सपाटा चालूच असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
...........
सध्या ३८ डिग्री सेल्सिअस इतके तापमान आहे. त्यामुळे जमिनीच्या पोटामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या लागवड केल्यास उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाऊस पडल्यानंतर १० जूननंतर कपाशीची लागवड करावी.
- रवींद्र आंधळे,
सहयोगी प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
..........
दरवर्षीच्या अनुभवानुसार कपाशीची लागवड केली आहे. आत्ता कपाशी लागवड केली तर कपाशीचे पीक जोमात येऊन उत्पादनात वाढ होते. उशिरा लागवड केल्याने पावसाळ्यामध्ये कपाशीच्या झाडाला येणाऱ्या कैऱ्यांना धोका होऊ शकतो. १० जूननंतर कपाशी लागवड केल्याने पुढील हंगामातील पिकास वावर तयार करण्यासाठी लेट होते. त्यामुळे सध्या कपाशी लागवड करणेच योग्य आहे, असे मत शेतकरीवर्गातून व्यक्त केले जात आहे.
- सिद्धार्थ गाडे
शेतकरी, बारागाव नांदूर
..........
फोटो - कपाशी
कडाक्याच्या उन्हात शेतकऱ्यांची कपाशी लागवडीची लगबग