नितेश राणेंकडून भाषणात आयुक्तांना शिवीगाळ; प्रशासनालाही दिली धमकी
By साहेबराव नरसाळे | Published: April 18, 2023 07:23 PM2023-04-18T19:23:29+5:302023-04-18T19:23:58+5:30
नितेश राणेंकडून भाषणात आयुक्तांना शिवीगाळ करण्यात आली.
अहमदनगर : भाजप आमदार नितेश राणे यांनी नगरमधील कापड बाजारात चौक सभेत भाषण करताना महापालिका आयुक्तांना थेट शिवीगाळ केली. काही अधिकारी अल्पसंख्याकांची बाजू घेत आहेत. त्यांना खुर्ची ठेवणार नाही. तुम्हाला कोण वाचवितो ते पाहतोच, अशा शब्दात त्यांनी प्रशासनालाही धमकी दिली.
नगरमध्ये काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण झाली होती. या व्यापाऱ्याची भेट घेण्यासाठी राणे मंगळवारी (दि.१८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास नगरमध्ये आले होते. त्यांनी हॉस्पिटलमध्ये जखमी व्यापाऱ्याची भेट घेतली. तसेच रामवाडी, वारुळवाडी घटनेतील लोकांचीही भेट घेतली. त्यांनी कापड बाजारात पाहणी करून शहाजी भोसले चाैकात सभा घेतली. ते म्हणाले, हिंदू व्यापाऱ्यांना टार्गेेट करण्याचे काम नगरमध्ये सुरू आहे. व्यापाऱ्यांना मारहाण करणारे शहरात अतिक्रमण करून हिंदूंवर अन्याय करतात. त्यांचे रक्षण करणे आणि कायदा सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम आहे. पण पोलिस ते करीत नाहीत. पण आता मी त्यांना सांगतो की, सरकार बदललेले आहे.
त्या लोकांना वाचविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्यूट्या आता कोण वाचवितो, तेच मी पाहतो. त्यांच्याकडे हत्यारे येतात कोठून. आता मी तयारी करून आलोय. कोणालाही सोडणार नाही. सरकार कोणाचे आहे, गृहमंत्री कोण आहेत, फडणवीस आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत. तो इथला आयुक्त ... (शिवी), त्याला काय जास्त .. (शिवी) चढलाय काय? अशा भाषेत राणे यांनी आयुक्तांबद्दल भाष्य केले. आता व्यापाऱ्यांकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचे डोळे जाग्यावर ठेवणार नाही. आता बस झाले. तुमचा एकदाच जय श्रीराम करायची वेळ आली आहे, अशी विधाने त्यांनी केली.