समित्यावर समित्या आणि चौकशीचा फार्स

By Admin | Published: May 23, 2014 01:19 AM2014-05-23T01:19:36+5:302014-05-23T01:27:48+5:30

अहमदनगर : सावली संस्थेत मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारीवरुन बालकल्याण समितीने रिमांड होममध्ये स्थलांतरित केलेली बालके बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुन्हा ‘सावली’त दाखल झाली़

Committee on Committees and inquiry fars | समित्यावर समित्या आणि चौकशीचा फार्स

समित्यावर समित्या आणि चौकशीचा फार्स

 अहमदनगर : सावली संस्थेत मुलांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारीवरुन बालकल्याण समितीने रिमांड होममध्ये स्थलांतरित केलेली बालके बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पुन्हा ‘सावली’त दाखल झाली़ दरम्यान, मिरॅकल फौंडेशनने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी विविध समित्या नेमण्यात आल्या़ या समितीत्यांनी केलेल्या चौकशीत काहीही तथ्य आढळले नसल्याचे समोर आले आहे़ मिरॅकल फौंडेशनने ३० एप्रिल रोजी बालकल्याण समितीकडे तक्रार केली होती़ समितीच्या तीन सदस्यांनी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता सावली संस्थेत जाऊन मुलांची चौकशी केली़ या चौकशीचा अहवाल व तक्रारीबाबत समितीने २ मे रोजी जिल्हा महिला बालविकास अधिकार्‍यांना कळविले़ त्यानंतर ५ मे रोजी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, बालकल्याण समिती यांनी एकत्रित सावली संस्थेला भेट दिली़ या भेटीचा अहवाल तयार होण्यास तब्बल ११ दिवस लागले़ १६ मे रोजी समितीचा अहवाल सादर झाला़ दरम्यान ६ मे रोजी बालकल्याण समितीने १३ लोकांची चौकशी समिती नेमून बैठकीचे आदेश दिले़ मात्र, शेवटपर्यंत या समितीची एकही बैठक झाली नाही़ विशेष म्हणजे, या समितीतील एकाही सदस्याला समितीच्या स्थापनेबाबत कळविले नव्हते़ त्यामुळे अखेरपर्यंत ही समिती स्थापन होऊ शकली नाही़ बालकांचा रिमांड होममधील मुक्काम लांबला असतानाच महिला व बालकल्याण आयुक्तांनी १२ मे रोजी चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला दिले होते़ बालकल्याण विभागाने २१ मे रोजी समितीची स्थापना केली़ समितीची पहिली बैठक त्याच दिवशी दुपारी ३ ते ६ वाजेपर्यंत चालली़ या समितीच्या अध्यक्षपदी लता कांकरिया होत्या़ समितीत प्रभारी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रवींद्र पवार, लता गांधी, परिविक्षा अधिकारी निसळ, बालसंरक्षण अधिकारी थोरात आदींचा समावेश होता़ समितीने बालकांचे जबाब घेऊन त्याच दिवशी रात्री आठ वाजता अहवाल बालकल्याण समितीला दिला़ दरम्यान, बालकल्याण समितीने १६ मे रोजी जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी व जिल्हा बालसंरक्षण अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले़ बालसंरक्षण अधिकार्‍यांनी व तीन परिविक्षा अधिकार्‍यांनी १७ मे रोजी चौकशी केली़ त्याचा अहवाल १९ मे रोजी दिला़ तर १९ मे रोजी पोलिसांच्या विशेष पथकाद्वारे चौकशी करुन अहवाल देण्यास सांगण्यात आले होते़ पोलिसांकडून शेवटपर्यंत अहवाल आला नाही़ १० मे ते २१ मे या काळात बालकल्याण समितीने विविध चौकशी समित्यांची नेमणूक करुन तब्बल ५ वेळा बालकांची चौकशी केली़ मात्र, त्यात काहीही निष्पन्न झाले नाही़ तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आल्यानंतरही बालकांच्या हक्कांना बाधा पोहचविण्यात आली़ मात्र, बाल हक्काची खुलेआम पायमल्ली होत असताना त्याची साधी कोणी तक्रारही केली नाही, हे विशेष! (प्रतिनिधी)सावली संस्थेतील मुले चौकशीसाठी येथील रिमांड होममध्ये ठेवल्यानंतर या बालकांना प्राथमिक सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत़ सरकारचे थेट नियंत्रण असणार्‍या रिमांड होममध्येच बालहक्काचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले आहे़ रिमांड होममध्ये बालकांना दाखल केल्यानंतर बालहक्क अधिनियमानुसार एका बालकाला किमान ४० चौरस फूट जागा उपलब्ध करुन द्यावी, झोपण्यासाठी गादी, चादर व इतर कपडे पुरवावेत, मुलांना सकस आहार दिला जावा, बालकांचे डासांपासून संरक्षण करावे, बालकांना पालकांशी संपर्क साधण्यासाठी संपर्काची साधने उपलब्ध करुन द्यावीत, खुलेपणाची वागणूक मिळावी, सात बालकामागे एक स्वच्छतागृह, दहा बालकांमागे एक स्रानगृह असावे असे सरकारने बंधनकारक केले आहे़ मात्र, रिमांड होममध्ये सकस आहार मिळत नाही, डास चावतात, अंघोळीसाठी साबण मिळत नाही, शिळे अन्न दिले जाते, दडपण आणले जाते, अशा असंख्य तक्र्रारी बालकांनी केल्या होत्या़ मात्र, या तक्रारींची बालकल्याण समितीने का दखल घेतली नाही, रिमांड होमच्या अधीक्षिका यांनीही बालकांना का सुविधा पुरविल्या नाहीत, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित करण्यात येत आहे़बालनिरीक्षण गृहात पोलीस साध्या वेशात आले पाहिजेत, असे बालहक्क अधिनियम ४२ मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे़ मात्र, रिमांड होममध्ये १५ मे रोजी पोलिसांचे एक पथक खाकी गणवेश परिधान करुन आले होते़ या पोलीस पथकाला पाहून घाबरलेल्या मुलींनी महिला बालकल्याण समितीच्या अध्यक्षा लता गांधी आणि रिमांड होमच्या अधीक्षिका सुवर्णा कुलकर्णी यांच्यासमोरच टाहो फोडला़ पालकांनीही पोलिसांच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला होता़ मात्र, पालकांच्या तक्रारीची साधी दखलही घेतली नाही़ सरकारचे थेट नियंत्रण असलेल्या या बालनिरीक्षण गृहात बालहक्काचे उल्लंघन होत असताना त्याविरोधात कोणीही थेट भूमिका घेतली नाही, हे विशेष!सलग बारा दिवस रिमांड होममध्ये असलेली बालके बुधवारी बालकल्याण समितीने सायंकाळी उशीरा सावली संस्थेच्या ताब्यात दिली़ तत्पूर्वी बालकांना पालकांच्या ताब्यात द्यायचे की सावली संस्थेच्या ताब्यात द्यायचे यावरुन समितीच्या सदस्यांमध्येच खडाजंगी झाली़ समितीतील वाद वाढत असताना अध्यक्षांनी बालकांना सावली संस्थेच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला़बालकल्याण समितीच्या अध्यक्षा लता गांधी यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही़सूर्यास्तापूर्वी संस्थेच्या अथवा पालकांच्या ताब्यात बालकांना सोपवावे, असा नियम आहे़ मात्र, बुधवारी रात्री ८ वाजता रिमांड होममधून ही बालके सावली संस्थेत जाण्यासाठी रवाना झाली़ आणि रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही मुले सावली संस्थेत दाखल झाल्याचे सांगण्यात येते

Web Title: Committee on Committees and inquiry fars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.