संवाद साधा, धीर द्या, संगीत ऐकवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:21 AM2021-05-06T04:21:17+5:302021-05-06T04:21:17+5:30
श्रीरामपूर : कोरोनाच्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भीती दूर करा, त्यांना धीर द्या आणि शक्य झाले तर रुग्णांच्या ...
श्रीरामपूर : कोरोनाच्या रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या मनातील भीती दूर करा, त्यांना धीर द्या आणि शक्य झाले तर रुग्णांच्या कानी सुमधूर संगीत पडेल, अशी व्यवस्था करावी, अशा सूचना तहसीलदार प्रशांत पाटील यांनी शहरातील डॉक्टरांना दिल्या आहेत.
भयमुक्त सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर पाटील यांनी दिलेला भर निश्चितच स्वागतार्ह असल्याची भावना व्यक्त होत आहे. रुग्णांची वाढती संख्या, वाढता मृत्यूदर, वैद्यकीय असुविधा यामुळे तयार झालेल्या नकारात्मक वातावरणात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न यानिमित्ताने तहसीलदार पाटील यांनी केला आहे.
डॉक्टरांना पत्र पाठवून केलेल्या आवाहनात ते म्हणाले, तालुक्यातील सर्व कोविड रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ आपण सर्वजण अहोरात्र श्रम घेत आहात. आपला आणि परिवाराचा जीव धोक्यात घालून शेकडो कोविड रुग्णांना उत्तम उपचार देत आहात. कोविडवर निश्चित अशी उपचार पद्धती, हमखास रामबाण, प्रभावी औषधे नाहीत, हे वास्तव आहे. तरीदेखील आपण सर्वजण वैद्यकीय कौशल्य पणाला लावून रुग्णाच्या लक्षणांची तीव्रता, वय, जुने आजार इत्यादी गोष्टी विचारात घेऊन उपचार पद्धतीचा अवलंब करत आहात.
तहसीलदार तथा इन्सिडंट कमांडर या नात्याने माझ्या आपल्याकडून काही माफक अपेक्षा आहेत. आपण सर्वांनी रुग्णालयाच्या दारात आलेल्या प्रत्येक रुग्णाला बेड उपलब्ध नसले तरी किमान त्याची प्राथमिक तपासणी करून अन्य ओळखीच्या ठिकाणी बेड असल्यास तशी माहिती पुरवत त्याला धीर द्यावा. आर्थिक ऐपत नसलेल्या रुग्णांना उपचार नाकारू नका, सामाजिक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून आपण यावर नक्कीच मार्ग काढू शकतो.
दुर्दैवाने एखादं दुसरा मृत्यू झाला तरी अशा घटना इतर रुग्णांच्या निदर्शनास येणार नाहीत, याची खबरदारी घ्या. मोठमोठे एचआरसीटीसी स्कोर, अगदी ५०वर येऊनही खडखडीत बऱ्या केलेल्या यशस्वी गाथा रुग्णांना सांगा. त्यांना हसवा, कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला मरू देणार नाही, असं जेव्हा डॉक्टर रुग्णाला सांगतो, त्यावेळी त्याच्या अचेतन मनात एक चमत्कार घडत असतो, तो घडवा!
----
रेमडेसिविरचा आग्रह धरू नका
रेमडेसिविर दिले तरच कोरोना रुग्ण जगतो, बरा होतो हा लोकांमध्ये पसरलेला भ्रम दूर करा. ते न देताही बऱ्या झालेल्या रुग्णांचे शेकडो आकडे जाहीर करा. रुग्णांच्या मनाला उभारी देण्यासाठी त्यांना इंजेक्शनच्या, ऑक्सिजनच्या उपलब्धतेबाबत सकारात्मक माहिती द्या, असे आवाहन तहसीलदार पाटील यांनी केले आहे.
---