विमानाचे सीट बनविणारी नगरमधील कंपनी आगीत खाक; सहा कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:40 AM2017-12-15T10:40:27+5:302017-12-15T10:44:42+5:30
नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्या एकाच वेळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होत्या, रात्री ११ वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली.
अहमदनगर : नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्या एकाच वेळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होत्या, रात्री ११ वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत कंपनीचे सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
नागापूर एमआयडीसीत पुगलिया वुलन ही कंपनी आहे. या कंपनीत विमानाचे कुशन (सीट) तयार होते. हे सीट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपनीत उच्च प्रतीचे कापड होते. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता या कंपनीत आग लागली. कंपनीतील कापडाने भराभर पेट घेतल्यामुळे काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीने वेढली गेली. आग लागल्याचे समजताच कर्मचा-यांनी कंपनीच्या बाहेर धाव घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
आग विझविण्यासाठी महापालिकेचे ३, विखे साखर कारखान्याचे ३, एमआयडीसीचे ३, व्हीआरडीचे २, तनपुरे कारखान्याचे एक असे एकूण १२ अग्निशमक बंब घटनास्थळी दाखल झाले. ही आग विझविण्यासाठी तब्बल सव्वा चार लागले. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या आगीत सुमारे सहा कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण हेही घटनास्थळी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते़ कंपनीबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कंपनीचे मालक संजय पुगलिया हे मुंबईत राहतात. रात्री ते नगरमध्ये दाखल होऊ शकले नाहीत. तर कंपनीचे व्यवस्थापक तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या गावाकडे गेलेले आहेत. त्यामुळे अद्याप कंपनीकडून या जळीतकांडाची फिर्याद दाखल करण्यात आलेली नाही़ कंपनीचे प्रशासन आज नगरमध्ये येऊन फिर्याद देतील, अशी शक्यता कंपनीच्या कामगारांनी वर्तविली.