35 लाखांच्या ठेवी बुडवणा-या धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्ष-संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 10:46 AM2017-11-03T10:46:51+5:302017-11-03T10:47:11+5:30
अहमदनगरमधील काष्टी येथील धनश्री ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेत संस्थेच्या अध्यक्ष ज्योती गवळी व तिचा पती रमेश गवळी यांनी संगनमतानं लाखो रुपयांचा गैरव्यवहार व्यवहार केला आहे.
श्रीगोंदा (अहमदनगर) : काष्टी येथील धनश्री ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेत संस्थेच्या अध्यक्ष ज्योती गवळी व तिचा पती रमेश गवळी यांनी संगनमतानं लाखो रुपयांचा गैरव्यवहार व्यवहार केला आहे. अंबादास भानुदास राहिज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 35 लाख रुपयांच्या ठेवी बुडविल्याचा संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ व कर्मचारी यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या सर्वांविरोधात फसवणुकीता गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी तपासाची सूत्रे ताब्यात घेतली असून ठेवीदारांच्या तक्रारीत वाढ झाली तर संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
रमेश गवळी यांनी आपली पत्नी ज्योती गवळी यांच्या अध्यक्षतेखाली धनश्री महिला सहकारी संस्थेची स्थापना केली. उपाध्यक्षपदी डॉ. पवार यांची वर्णी लावली. जादा व्याजाचे गाजर दाखवून ठेवी जमा करण्यास सुरुवात केली. रमेश गवळी हा स्वत: दैनंदिन ठेवी जमा करीत होता. अंबादास राहिंज व डॉ. पांडुरंग नारायण दातीर यांनी धनश्री पतसंस्थेत ठेवी ठेवल्या. मुदत संपल्यानंतर ठेवीची रक्कम व्याजासह मागणी केली. मात्र रमेश गवळी याने ठेवीची रक्कम न देता ठेवीदाराच्याच विरुद्ध सावकारकीचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी अंबादास राहिंज यांना दिली.
गेल्या चार महिन्यांपासून धनश्री पतसंस्थेचे कार्यालय बंद केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून अनेक ठेवीदारांनी आपल्या पैशांची मागणी केली असल्याचे समजते. काही ठेवीदारांना मी तुमचे पैसे देतो, तुम्ही गुन्हा दाखल करू नका असे सांगून ठेवीदारांमध्ये उभी फुट पाडल्याचे पोलिसांनी सांगितले.
संचालक मंडळाची मालमत्ता जप्त
धनश्री पतसंस्थेत मोठी आर्थिक गडबड झाली आहे. अंबादास राहिंज यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस तपासात काय निष्पन्न होते यावरून ठेवीदारांचे पैसे वसुल करण्याच्या दृष्टीने संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करण्याबाबत कारवाई करणार आहे. - बाजीराव पोवार, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा