अहमदनगर जिल्हा बँक भरतीबाबत मुख्यमंत्री, पवारांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 11:19 AM2020-05-15T11:19:08+5:302020-05-15T11:19:58+5:30
जिल्हा सहकारी बँकेने नियमांची पायमल्ली करुन भरती प्रक्रिया राबविल्याचे दिसत आहे. यात गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होऊन वशिलेबाजीने अनेकांची वर्णी लागलेली आहे. ही भरती रद्द करुन दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना निवेदन पाठवून केली आहे.
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेने नियमांची पायमल्ली करुन भरती प्रक्रिया राबविल्याचे दिसत आहे. यात गुणवत्ताधारक उमेदवारांवर अन्याय होऊन वशिलेबाजीने अनेकांची वर्णी लागलेली आहे. ही भरती रद्द करुन दोषींवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच शरद पवार यांना निवेदन पाठवून केली आहे.
लगड यांनी तक्रारीत म्हटले आहे, बँकेने काही उमेदवारांना पात्रता असूनही नियुक्ती दिलेली नाही. तर काही उमेदवार अपात्र असताना त्यांना नियुक्ती दिली. बँकेने ‘नायबर’ या संस्थेला भरतीचे काम दिले होते. मात्र, या संस्थेने परस्पर अन्य संस्थेकडून भरतीचे कामकाज करुन घेतले. हा नियमांचा भंग आहे.
भरतीतील आक्षेपार्ह उत्तरपत्रिका सहकार विभागाने सरकारी एजन्सीकडून तपासून घ्याव्यात असा न्यायालयाचा आदेश होता. मात्र, सहकार विभागाने खासगी एजन्सीकडून या उत्तरपत्रिका तपासून भरती योग्य ठरविण्याचा प्रयत्न केला. हा न्यायालयीन आदेशाचा भंग आहे. त्यामुळे या सर्व मुद्यांवर भरतीची तातडीने चौकशी होऊन ती रद्द ठरवावी. तसेच यात दोषीं असणारे तत्कालीन सहकार आयुक्त, विभागीय सहनिबंधक, बँकेचे संचालक यांचेविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी. लगड यांनी आपल्या तक्रार अर्जासोबत ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झालेली कात्रणेही जोडली आहेत.
नगर जिल्हा हा सहकारात अग्रेसर असलेला जिल्हा आहे. या बँकेला मोठा इतिहास असून नावलौकिक आहे. अशा बँकेत गैरप्रकार घडणे हे निंदनीय असल्याने आपण या प्रश्नाकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले असल्याचेही लगड ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.
सीआयडी चौकशी करा : दहातोंडे
जिल्हा बँकेच्या भरतीत मोठा घोटाळा झालेला आहे. सहकार विभागाने प्रथम ही भरती रद्द ठरवली होती. मात्र, काही उमेदवार न्यायालयात गेल्यानंतर फेरचौकशी झाली. या फेरचौकशी समितीने चौकशीचा केवळ फार्स करुन सर्व भरती कायदेशीर ठरविण्यात आली. ही जनतेची फसवणूक आहे. या सर्व भरतीची सीआयडीमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे. सहकार विभागाचे अधिकारी यात बोटचेपी धोरण घेत आहेत. काही ठराविक तालुक्यांतील उमेदवारच भरतीत कसे निवडले जातात? हे शंकास्पद आहे. लॉकडाऊन संपताच आपण याबाबत आंदोलन छेडणार असल्याचे या भरतीतील तक्रारदार संभाजी दहातोंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
उमेदवाराचीही तक्रार
बँक भरतीत परीक्षार्थी असलेल्या मोहित कदम या उमेदवारानेही राज्याच्या सहकार सचिवांकडे व सहकार आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. आपणाला ज्युनिअर आॅफिसर या पदासाठी ७० गुण मिळालेले आहेत. ७१ गुणांवर या पदाची भरती बंद झाली. मात्र, प्रतीक्षा यादीतील मेरिट कोठपर्यंत आले याची काहीही माहिती आपणाला मिळालेली नाही. या भरतीत काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांत परीक्षेनंतर फेरफार करण्यात आला. अशा उमेदवारांची बँकेत निवड झाली आहे. या उत्तरपत्रिका सहकार विभागाने सरकारी एजन्सीकडून तपासून घेणे टाळले आहे. त्यामुळे सरकारने भरतीची पुन्हा चौकशी करावी,अशी मागणी या उमेदवाराने केली आहे.