मोबाइल टाॅवर कंपन्यांविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:20 AM2021-05-12T04:20:39+5:302021-05-12T04:20:39+5:30
अहमदनगर : मोबाइल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाच्या संकटकाळात कंपन्यांकडून कोणत्याही आरोग्य सुविधा पुरविल्या ...
अहमदनगर : मोबाइल टॉवरची देखभाल व दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाच्या संकटकाळात कंपन्यांकडून कोणत्याही आरोग्य सुविधा पुरविल्या जात नाहीत. शासनाने याबाबत कंपन्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी मोबाइल टाॅवर असोसिएशनचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोनाच्या संकट काळात मोबाइल सेवा पुरविण्याचे काम तांत्रिक कामगार करीत आहेत. कोरोनाची लागण झाल्याने काहींना जीव गमवावा लागला आहे. काही कामगार रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या कामगारांचा कंपन्यांनी आरोग्य विमा उतरवावा तसेच मयतांच्या कुटुंबीयांना मदत द्यावी, या मागणीसाठी कंपनी व्यवस्थापनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. परंतु, कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने मोबाइल टाॅवर असोसिएशनने सरकारकडे याबाबत तक्रार केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात मोबाइल टॉवर तांत्रिक कामगार संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडकर यांनी म्हटले आहे की, कंपन्यांनी कामगारांचा आरोग्य विमा, अपघाती विमा उतरवावा, कामगारांना संसर्ग झाल्यास वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची जबाबदारी कंपन्यांनी उचलावी, कोरोनामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना अर्थिक मदतीची रक्कम जाहीर करावी, कामगारांच्या वेतनात वाढ करावी. यासह इतर मागण्यांसाठी आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स जिओ या कंपन्यांकडे कामगारांच्या मागण्यांबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी कामगारांना दमदाटी करून काम करून घेतले जात असून, सरकारने याबाबत लक्ष घालून संबंधित कंपन्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी खेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.