वाळूच्या डंपर चालकाविरूद्ध शेवगावात गुन्हा दाखल : युवकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 07:05 PM2019-03-05T19:05:41+5:302019-03-05T19:05:54+5:30
शरद एकनाथ सोनवणे (वय २२, रा. आखतवाडे) या युवकाचा वाळूच्या डंपरचालकाने रविवारी रात्री बळी घेतल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास तब्बल २४ तास लागले.
शेवगाव : शरद एकनाथ सोनवणे (वय २२, रा. आखतवाडे) या युवकाचा वाळूच्या डंपरचालकाने रविवारी रात्री बळी घेतल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास तब्बल २४ तास लागले. सोमवारी रात्री याबाबत डंपरचालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
शेवगावहून नगरकडे निघालेल्या वाळूने भरलेल्या डंपरने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरून शेवगावकडे येणारा शरद सोनवणे हा रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जागीच ठार झाला. मयताचे वडील एकनाथ मच्छिंद्र सोनवणे यांनी पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी डंपर (क्रमांक एम. एच. १६, ए. वाय. ५४५) चालक किरण राजेंद्र काटे (रा.मुंगी, ता.शेवगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. अपघातानंतर पोलिसांनी डंपर पोलीस ठाण्यात आणून लावला आहे. युवकाच्या मृत्यूबाबत पोलिसांनी सुरूवातीस अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर मयताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी डंपर चालकाविरूद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानेश्वर माळवे अधिक तपास करीत आहेत.
शेवगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद असल्याचा दावा महसूल व पोलीस प्रशासनाकडून वारंवार केला जात आहे. पण तालुक्यात राजरोसपणे रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या जनतेतून तक्रारी असून गोदावरी नदीच्या पात्रातील मुंगी व तालुक्यातील विविध नदी पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी होत आहे.