श्रीरामपूर पालिकेचे निम्मे नगरसेवक चौकशीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 02:49 PM2019-01-23T14:49:30+5:302019-01-23T14:51:34+5:30

निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण या विचाराला फाटा देत श्रीरामपूर नगरपालिकेत शंभर टक्के राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.

 In the complaint of Shrirampur municipal commissioner | श्रीरामपूर पालिकेचे निम्मे नगरसेवक चौकशीच्या विळख्यात

श्रीरामपूर पालिकेचे निम्मे नगरसेवक चौकशीच्या विळख्यात

शिवाजी पवार
श्रीरामपूर : निवडणुकीपुरते राजकारण व नंतर समाजकारण या विचाराला फाटा देत श्रीरामपूर नगरपालिकेत शंभर टक्के राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. जिरवाजिरवी व शह-काटशहामुळे तब्बल अठरा नगरसेवक अपात्रतेच्या कारवाईचा व वेगवेगळ्या चौकशींचा सामना करीत आहेत. नगराध्यक्षा अनुराधा आदिक यादेखील या चक्रात अडकल्या आहेत.
महाआघाडीच्या गटनेत्या भारती कांबळे व भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक रवी पाटील यांना मंगळवारी संध्याकाळी उशिरा न्यायालयाची नोटीस मिळाली. अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप एजाज पठाण यांनी करीत दोघांवर न्यायालयात दावा ठोकला आहे. अशा प्रकारचे न्यायालयाचे झेंगट लागलेले हे दोघे पालिकेतील अठरावे नगरसेवक (एकूण ३४ सदस्य) ठरले आहेत. नगरपालिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.
दिवंगत ज.य.टेकावडे, मधुकरराव देशमुख, रामचंद्र महाराज उपाध्ये, खासदार गोविंदराव आदिक, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार जयंत ससाणे या दिग्गज नेत्यांची नगरपालिकेला परंपरा राहिली आहे. टोकाच्या राजकारणातही व्यक्तिगत द्वेश व हेवेदावे बाजूला सारले गेले. आता मात्र तब्बल थेट अपात्रतेच्या कारवाईच्या नोटिसांनी पालिकेचे वर्तुळ ढवळून निघाले आहे.
दस्तुरखुद्द नगराध्यक्षा अनुराधा आदिक, माजी नगराध्यक्ष संजय फंड, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, राजेंद्र पवार, मुजफ्फर शेख, रवी पाटील, भारती कांबळे हे नगरसेवक चौकशींचा सामना करीत आहेत. यातील अनेक जणांवर थेट अपात्रतेचे संकट घोंगावते आहे.
दरम्यान, काँग्रेस नगरसेवक अंजूम शेख यांच्यासह दहा नगरसेवक उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पक्षांतर बंदी कायद्याच्या एका खटल्याचा सामना करीत आहेत. अजून काही नगरसेवक या फेऱ्यात अडकण्याची चर्चा आहे.
नगरसेवकांच्या नगर-औरंगाबाद-दिल्ली व्हाया मुंबई अशा खेटा सुरू आहेत. या सर्व प्रकारात अनेक नेत्यांनी वकिलांची मोठी फौजच दिमतीला ठेवल्याचे चित्र आहे. शहरात हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे.

बदली, अपशब्द,पक्षांतर बंदी, बांधकामाच्या तक्रारी
नगराध्यक्षा अनुराधा आदिक : नवरात्रोत्सवातील खर्चाला मान्यता, शिक्षण मंडळाच्या कर्मचाºयासह वर्ग ३ व ४ च्या कर्मचाºयांच्या बदलीचे आदेश यासह इतर काही तक्रारी.
संजय फंड, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे : बांधकामाविरोधात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार.
मुजफ्फर शेख : नगराध्यक्षांविरोधात सर्वसाधारण सभेत अपशब्द वापरल्याची तक्रार.
अंजूम शेख, शामलिंग शिंदे, बाळासाहेब गांगड, ताराचंद रणदिवे, समिना शेख, राजेश अलघ, हेमा गुलाटी यांच्यासह दहा नगरसेवकांवर पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत तक्रार.
रवी पाटील आणि भारती कांबळे : बांधकामाविरोधात तक्रार.

नगराध्यक्षा आदिक चौकशीच्या फे-यात
न्यायालयाचे झेंगट लागलेले हे दोघे पालिकेतील अठरावे नगरसेवक (एकूण ३४ सदस्य) ठरले आहेत. नगरपालिकेच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे.
नगराध्यक्षा अनुराधा आदिक यादेखील या चक्रात अडकल्या आहेत. नगरसेवकांच्या नगर औरंगाबाद-दिल्ली व्हाया मुंबई अशा खेटा सुरू आहेत. अजून काही नगरसेवक या फेºयात आहेत.

 

Web Title:  In the complaint of Shrirampur municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.