वांबाेरी चारी टप्पा दोन पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:20 AM2021-03-08T04:20:56+5:302021-03-08T04:20:56+5:30
करंजी : अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या ५० वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आणि ...
करंजी : अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या ५० वर्षांच्या लढ्याला अखेर यश आले आणि वांबोरी चारीचे पाईपलाईनद्वारे या भागास पाणी मिळाले. मात्र या योजनेपासून वंचित असलेल्या गावांसाठी वांबोरी चारी टप्पा दोनचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील गावांसाठी वरदान ठरलेली वांबोरी चारी गेल्या दोन वर्षापासून कार्यान्वित झाली. यासाठी या भागातील शेतकऱ्यांनी ५० वर्षांहून अधिक काळ लढा दिला. वांबोरी चारीचे रूपांतर वांबोरी चारी पाईपलाईन योजनेत करण्यात येऊन ही योजना पूर्ण करण्यात आली. ‘लोकमत’ने वर्षभर विविध वृत्तांच्या माध्यमातून प्रकाश टाकून अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.
गेल्या २ वर्षापासून वांबोरी पाईपलाईन योजनेद्वारे या भागातील पाझर तलावात मुळा धरणाचे पाणी सोडले जात आहे. वांबोरी चारी पाईपलाईन योजनेत अनेक त्रुटी व उणिवा राहिल्याने डोंगराच्या कडेला असणारी गावे मात्र या योजनेत समाविष्ट होऊ शकली नाहीत. या भागातील दुष्काळ कायमचा संपवायचा असेल तर वांबोरी चारी टप्पा दोनचे काम व्हायला हवे. हे काम व्हावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
९० कोटी रूपये खर्चाची वांबोरी चारी टप्पा २ ही योजना म्हणजे थेट मुळा धरणातून लोखंडी पाईपलाईनद्वारे डोंगराच्या कडेकडेने या भागातील वंचित गावांना पाणी देणे होय. पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, चिचोंडी, लोहसर ते करंजीपर्यतच्या तलावात या योजनेद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. ही योजना पूर्ण झाल्यास या भागाचा कायापालट होईल.
--
वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्न मार्गी लागल्यास या भागाचा कायापालट होऊन वंचित असलेल्या गावांना न्याय मिळेल.
-अरूण आठरे,
अध्यक्ष, वांबोरी चारी कृती समिती