भावीनिमगावात संपूर्ण लॉकडाऊन,कोरोनाबाधित बसचालकाने येथेही राखले प्रसंगावधान, भेटण्यासाठी गेलेल्यांनी वाढवली चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 12:33 PM2020-06-18T12:33:31+5:302020-06-18T12:33:31+5:30
दहिगावने : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे दि१३ रोजी आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल दि.१६ रोजी पॉसिटीव्ह आल्याने गाव २९ जूनपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.
दहिगावने : मुंबईहुन (कुर्ला) भावीनिमगाव (ता शेवगाव) येथे दि१३ रोजी आलेल्या विलगीकरण कक्षातील ४१ वर्षीय व्यक्तीचा कोरोना तपासणी अहवाल दि.१६ रोजी पॉसिटीव्ह आल्याने गाव २९ जूनपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवेसह सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या असून गावात ये-जा करण्यास बंदी घातली आहे. वैद्यकीय पथकाद्वारे गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. सदर कोरोनाबाधित व्यक्ती एसटी बस चालक आहे. कायम प्रसंगावधान राखणाऱ्या या चालकाने येथेही प्रसंगावधान राखत थेट विलगीकरण कक्ष गाठला होता.
मात्र त्यांना अगोदरच पोटाचा त्रास असल्याने येथून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी जाताना त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासोबत दोघांनी प्रवास केला. शिवाय एकजण त्यांना भेटण्यासाठी गेला. तिघे जण नगरहून पुन्हा गावातील विलगीकरण कक्षात दाखल झाले असा अहवाल दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कैलास कानडे व डॉ सुमित श्रावणे यांनी तहसीलदार यांना दिला. त्यामुळे दि१७ रोजी या तिघांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले. या सर्व घडामोडींमुळे गाव संपूर्ण लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे तहसीलदार अर्चना पागिरे यांनी सांगितले.
या काळात शेवगाव पोलीस स्टेशनचा एकही कर्मचारी गावाकडे फिरकला नाही अशी माहिती आपत्तीव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी तहसीलदारांना दिली. त्यानंतर तहसीलदारांनी फोनवर तात्काळ संपर्क करत बंदोबस्त देण्याचे सांगितले.
फोटो - भावीनिमगाव ता शेवगाव येथे भेट देत तहसीलदार अर्चना पागिरे यांनी आपत्तीव्यवस्थापन समितीला मार्गदर्शक सूचना दिल्या.
-----------------