जिल्ह्यातील १ हजार ५९६ गावांतील सात-बारा उताऱ्यांचे संगणकीकरण पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 07:26 PM2018-04-14T19:26:47+5:302018-04-15T12:44:00+5:30
शेतक-यांसाठी, तसेच इतर स्थावर मालमत्ताधारकांसाठी सात-बारा उता-याचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यात खाडाखोड किंवा बदल होऊ नये, तसेच हा उतारा त्वरित मिळाला म्हणून शासनाने सात-बारा उता-यांचे संगणकीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार नगर जिल्ह्यात जवळपास शंभर टक्के संगणकीकरणाचे काम झाले आहे.
अहमदनगर : शेतक-यांसाठी, तसेच इतर स्थावर मालमत्ताधारकांसाठी सात-बारा उता-याचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यात खाडाखोड किंवा बदल होऊ नये, तसेच हा उतारा त्वरित मिळाला म्हणून शासनाने सात-बारा उता-यांचे संगणकीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार नगर जिल्ह्यात जवळपास शंभर टक्के संगणकीकरणाचे काम झाले आहे. त्यामुळे यापुढे आता सर्वांना आॅनलाईन सात-बारा उतारे मिळणार आहेत. नाशिक विभागात नगर जिल्हा या कामात आघाडीवर आहे.
जिल्ह्यात एकूण १ हजार ६०२ गावे असून त्यापैकी १ हजार ५९६ गावांतील सात-बारा उताºयांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आॅनलाईन सात-बारामध्ये जिल्हा नाशिक विभागात सर्वांत पुढे आहे. जिल्ह्यातील केवळ सहा गावे यात मागे राहिली आहेत. येत्या पंधरा दिवसांत या गावांतही हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून आॅनलाईन सात-बारा तयार करण्याचे काम सुरू होते. प्रत्येक गावात ग्रामसभा, चावडी वाचन, सात-बारा अद्यवतीकरण, ग्रामस्थांच्या शंका, त्यानुसार उता-यात दुरूस्ती आदी कामे तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदारांनी त्यांच्या स्तरावर पूर्ण केली आहेत.त्यामुळे नगर, अकोले, कर्जत, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा या आठ तालुक्यांत सात-बारा संगणकीकरणाचे शंभर टक्के काम पूर्ण झाले आहे. आता केवळ कोपरगाव, जामखेड, राहाता, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर या सहा तालुक्यांतील प्रत्येकी एक गाव संगणकीकृत करण्याचे राहिले आहे.
आॅनलाईन सातबारामुळे प्रशासन गतिमान होणार असून कामात पारदर्शकता येणार आहे. आॅनलाईन उता-यामध्ये आता तलाठ्यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही. बदल करण्यासाठी मात्र तहसीलदारांची परवानगी आवश्यक राहणार आहे. आतापर्यंत एकूण १२ लाख ५४ हजार ७७१ सातबारा उतारे संगणकीकृत झाले आहेत.
तालुकानिहाय आॅनलाईन गावांची संख्या
नगर १२०, अकोले १९१, कर्जत ११८, कोपरगाव ७८, जामखेड ८६, नेवासा १२७, पाथर्डी १३७, पारनेर १३१, राहाता ६०, राहुरी ९६, शेवगाव ११२, श्रीगोंदा ११५, श्रीरामपूर ५५, संगमनेर १७०.