जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाकडे
By Admin | Published: May 21, 2014 11:46 PM2014-05-21T23:46:39+5:302014-05-22T00:01:53+5:30
राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या सात मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून
राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या सात मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवरेच्या पाण्यावर सुरू होणारा हा तिसरा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे. प्रवरेच्या पाण्यावर भंडारदरा येथे सुरुवातीला बारा मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प शासनामार्फत उभारण्यात आला. यानंतर याच पाण्यावर कोदणी येथे ३४ मेगावॅट क्षमतेचा दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. मात्र कोदणीचा प्रकल्प सुरू राहण्यासाठी त्यास २ हजार ७०० क्युसेकचा पाण्याचा विसर्ग आवश्यक असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांतच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असतो. तर इतर वेळी भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हे पाणी रंधा येथील उन्नयनी बंधार्यात साठविले जाते त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी सोडण्यात येत असते. भंडारदरा- १ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास वर्षाला सुमारे साडेतीन हजार कोटी युनिट, तर कोदणीतून साडेपाच हजार कोटी युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. हे दोन्ही प्रकल्प करार पद्धतीने खासगीरित्या चालविण्यास दिले आहेत. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुढे निळवंडे धरणात साठविण्यात येते व त्यानंतर ते प्रवरा पात्रात सोडण्यात येते. या पाण्यावरच पुन्हा वीजनिर्मिती करण्याचे ठरवत शासनाने हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारण्यास परवानगी दिली व काही महिन्यांत हा प्रकल्पही उभा राहिला. वीज निर्मितीसाठी ३.५ मेगावॅट क्षमतेचे दोन टर्बाईन उभारण्यात आले असून, विजेचे पॅनल बोर्डही बसविण्यात आले आहेत. यात तयार होणारी वीज भोजदरी येथील १३२ केव्ही उपकेंद्रास जोडण्यात येणार होती, मात्र हे उपकेंद्र अद्याप उभे राहिले नसल्याने सध्या ही वीज राजूर वीज उपकेंद्रास जोडण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प ठिकाणापासून राजूरपर्यंत १९ मनोरे उभारण्यात येत आहेत. हे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी केवळ गेट बसविण्याचे काम बाकी आहे. हे काम एक दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याचा अंदाज द्वार-उभारणी पथकाचे सहाय्यक अभियंता पी. एन. थोरात यांनी व्यक्त केला. (वार्ताहर) ५३ मेगावॅटची क्षमता हा प्रकल्प पावसाळ्यात सुरू झाल्यास भंडारदरा धरणाच्या प्रवरेतील पाण्यावर एकूण ५३ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होईल आणि पावसाळा व धरणातील अन्य आवर्तन काळात या तीनही प्रकल्पांतून वर्षभरात सुमारे दहा हजार कोटी युनिटहून अधिक वीजनिर्मिती होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कॅनालच्या गेटशीही तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.