राज्यातील संगणक परिचालकांचे २२ फेब्रुवारीपासून मुंबईत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:21 AM2021-02-16T04:21:34+5:302021-02-16T04:21:34+5:30
संगमनेर : राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने शासनाकडे केली ...
संगमनेर : राज्यातील संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने शासनाकडे केली आहे. या परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी २२ फेब्रुवारीपासून राज्यातील २९ हजार ग्रामपंचायतींमध्ये काम करणारे २० हजार संगणक परिचालक आझाद मैदान (मुंबई) येथे बेमुदत धरणे आंदोलन करणार आहेत, असे संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष निलेश निर्मळ यांनी सांगितले.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘संग्राम’ व ‘आपले सरकार’ या दोन प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर राज्यातील संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. परंतु शासनाने संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय. टी. महामंडळाकडून नियुक्ती देऊन किमान वेतन देण्याच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर नेहमी अन्याय झाला आहे. ग्रामविकास विभागाने १४ जानेवारी २०२१ च्या शासन निर्णयात घेतलेल्या निर्णयानुसार अगोदर असलेल्या तुटपुंज्या सहा हजार रूपये मानधनात एक हजार रुपये वाढ केली. महागाईच्या काळात एक हजार रूपयाच्या वाढीत संगणक परिचालकांनी कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा? हा प्रश्न आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात संगणक परिचालकांच्या मनात तीव्र असंतोष आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यातील ३५१ पंचायत समिती कार्यालयांसमोर २५ जानेवारी ला काळ्या फिती लावत, निदर्शने करून शासन निर्णयाची होळी करण्यात आली. आय. टी. महामंडळाकडून कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे. या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.