शेतक-यांचे संघर्षशील नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 05:24 PM2019-08-19T17:24:54+5:302019-08-19T17:25:11+5:30

बोरावके कुटुंबीय पुणे जिल्ह्यातील सासवड येथील़ तिथे त्यांना पुरेशी जमीन नव्हती आणि दुष्काळाने तर ‘आ’ वासलेला़ कधी कोणाला गिळेल याची काहीही शाश्वती नव्हती़ त्याचवेळी इंग्रजांची जमीन कसण्याबाबतची एक जाहिरात वाचनात आली आणि बोरावके कुटुंबीय येसगावात येऊन स्थायिक झाले. सर विश्वेश्वरैया यांच्या सांगण्यावरून त्यांनी कोपरगाव परिसरात ८५० एकरात मोसंबीची बाग लावली. त्याकाळात ही बाग आशिया खंडातील सर्वात मोठी मोसंबीची बाग होती. १९५२ साली तत्कालीन पंतप्रधान  जवाहरलाल नेहरू यांनी भेट देऊन या बागेची प्रशंसा केली होती़ 

Confederate leaders of farmers | शेतक-यांचे संघर्षशील नेते

शेतक-यांचे संघर्षशील नेते

अहमदनगर : भास्करराव बोरावके उर्फ  भाऊ यांचे कुटुंब मूळचे पुणे जिल्ह्यातील सासवड येथील. तेथे त्यांच्या आधीची पिढी शेती करायची पण पाऊस कमी जमीनही विशेष नव्हती. दुष्काळ एवढा की पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवायचे. कोपरगाव तालुक्यात इंग्रजांनी १९२५ ते ३० च्या दरम्यान गोदावरी नदीवर कालवे काढले. शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होऊ लागले.परंतु या पाण्याचा वापर फारसा कुणी करेना. इंग्रज मोठे व्यावहारिक होते. झालेला खर्च गोळा व्हावा म्हणून या भागात जो येईल व शेती करेल त्यांना पाण्याची व्यवस्था करून दिली जाईल. अशा वर्तमानपत्रात जाहिराती दिल्या. ही जाहिरात पाहिल्यानंतर भाऊंचे वडील शंकरराव काका, बापूराव व तुकाराम हे ब्राम्हणगाव, येसगाव या भागात आले व भरपूर जमिनी खंडाने घेतल्या. काही विकत घेतल्या. प्रथम उसाची शेती व गुळाचे उत्पादन सुरु केले. भास्करराव यांचा जन्म हा १९ आॅक्टोबर १९३१ रोजी सासवड येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सासवड येथे झाले. तेथे त्यांचा राष्ट्र सेवा दलाच्या शाखेशी संबंध आला व बालपणीच पुरोगामी विचाराचे संस्कार झाले होते. येसगावला आल्यानंतर तत्कालीन लोक जागृतीच्या व समाज परिवर्तनाच्या चळवळीशी असलेले त्यांचे संबंध खूप वाढत गेले. त्याकाळात स्व.गंगाधर गवारे मामा हे राष्ट्र सेवा दलाचे नेते होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य आंदोलनात जी कामे करणे शक्य होईल ती कामे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भाऊंचे घर म्हणजे गोकुळच. लेकी, सुना, जावा, नातवंड, भाऊ या सर्वांचा राबता घरात असायचा. भाऊंच्या आईपासून हा पूर्ण परिवार सेवा दलात होता. आलेल्या प्रत्येक कलाकाराचे व कार्यकर्त्याचे आदरातिथ्य भास्करराव व त्यांच्या  पत्नी  सुशीलाबाई करायच्या. भाऊंच्या वस्तीवर मोकळा परिसर असल्यामुळे व खूप झाडी असल्यामुळे राष्ट्र सेवा दलाची व समाजवादी कार्यकर्त्यांची अनेक शिबिरे त्यांच्या वस्तीवर झाली. अनेक मान्यवर नेते मंडळींचे काही काळ त्यांच्या वस्तीवर वास्तव्य होते. 
यात शामराव पटवर्धन, भाऊसाहेब रानडे,  स्वातंत्र्य सैनिक रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, एस.एस.जोशी, डॉ. बापूसाहेब काळदाते, नानासाहेब गोरे, बै.नाथ पै, भाई वैद्य, मधू दंडवते, सा.रे. उर्फ आप्पासाहेब पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांचा समावेश होता. भास्करराव सुमारे १० वर्षे अखिल भारतीय राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त होते. त्या काळात महाराष्ट्रातील सर्व भागात तसेच भारतातील बहुतांशी प्रांतात सेवा दलाचे काम सुरु करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न त्यांनी केला.  
१९८० च्या दरम्यान शरद जोशी नावाचे वादळ शेतकºयांना उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून पुढे आले. सर्वत्र आंदोलने झाली. शेतकरी संघटनेने जे आंदोलन पुकारले त्या आंदोलनात भाऊ पहिल्यांदा सहभागी झाले. कोपरगाव येथील आंदोलनाचे नेतृत्व भाऊंनी पहिल्यांदा केले. त्यांच्या सहभागाचा खूप चांगला परिणाम दिसून आला. भाऊंसारखे नेतृत्व पुढे येत आहे हे पाहून या भागातील अनेक प्रतिष्ठित शेतकरी, डॉक्टर, वकील सहभागी झाले. यावेळी सुमारे ७ हजार शेतकºयांना अटक झाली. विसापूरच्या जेलमध्ये भाऊंसह सर्वांना ठेवण्यात आले. याकाळात सर्वांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध तयार झाले. रघुनाथ काका देवकर शेवटपर्यंत भाऊंच्या बरोबर राहिले. पुढे बद्रीभाऊ देवकरसह तालुक्यातील बरेच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. देशभरातील सर्व आंदोलनात भाऊ शरद जोशींच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहिले. रेल्वे स्टेशनवर गाडी उशिरा असेल तर किती वेळा शरद जोशी यांचेबरोबर फलाटावर वर्तमानपत्राचा कागद अंथरून दोघांनी झोप घेतली. घरी यायला रात्री उशीर झाला तर येसगावला उतरायचे व आपल्या वस्तीवर पायी पायी यायचे मग रात्री ३ ते ४ वाजता झोपायचे हा जणू दिनक्रमच झाला होता. पण आपला कुणाला त्रास होऊ दिला नाही. शेतकरी संघटनेची सभा म्हटली की दोन लाख, तीन लाख शेतकरी स्वत:च्या भाकरी घेऊन सभेला येतात. कोणतीही व्यवस्था नाही, निवारा नाही, पण आपल्याकरीता काम करणारा शरद जोशी नावाचा देव आहे ही भावना शेतकºयांच्या मनात होती. भारताच्या इतिहासात या आंदोलनाची निश्चितपणे नोंद झाली आहे. याचे श्रेय भाऊ व माई यांच्याकडेही जाते. शरद जोशी यांचा स्वभाव तसा कडक त्यामुळे सर्व कार्यकर्ते जोशी साहेबांकडे न जाता आपल्या अडचणी घेऊन भाऊंकडे जाऊन सोडवून घेत .त्यामुळे सर्वसामान्य शेतकºयाने साहेबांकडे न जाता भाऊंना भेटावे व आपले दुखणे मांडावे हा प्रघातच पडला. तसेच भाऊही मोठया आत्मियतेने सर्वांच्या अडचणी समजून घेत व सोडवत असे यामुळे शरद जोशी साहेबांची सावली व कार्यकर्त्यांची माउली म्हणून संघटनेत भाऊंचे स्थान निर्माण झाले. 
१९९१ साली राष्ट्र सेवा दलाचा सुवर्ण महोत्सव मेळावा पुणे येथील भारती विद्यापीठ येथे आयोजित केला होता. कोपरगाव येथून भास्करभाऊ व सुशीलामाई यांच्यासह १५० कार्यकर्ते या मेळाव्याला गेलो होतो. मेळाव्याच्या ठिकाणी पोहचण्यास थोडा उशीर झाला होता़ त्यामुळे सहाव्या मजल्यावरच्या टेरेसवर राहण्यासाठी जागा देण्यात आली होती. डिसेंबर महिना असल्याने थंडी खूप होती. रात्रभर थंडीने सर्वजण कुडकुडत होते. यामध्ये भाऊ आणि माईही त्या थंडीत राहिल्या होत्या. श्री साईबाबा संस्थानचे भाऊ १० वर्ष विश्वस्त होते. भाऊ कर्मकांडाच्या विरुद्ध होते. त्यामुळे मी संस्थानमध्ये येऊन काय करू? असा प्रश्न भाऊंनी सुखटणकर साहेबांना विचारला. साहेब म्हणाले, समाज सेवा करा. मग भाऊंनी त्यास मान्यता दिली. या काळांत भाऊंनी संस्थानच्या कोणत्याच व्यवस्थेचा उपभोग घेतला नाही. भाऊ सामाजिक कार्यात इतके व्यग्र होते की त्यांना राजकारणात यावे असे कधी वाटलेच नाही तरीही  शरद जोशींच्या आग्रहाखातर शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारत पक्षातर्फे त्यांनी कोपरगाव विधानसभेची निवडणूक  लढविली पण त्यात त्यांना अपयश आले. जीवनाच्या संध्याकाळी शेतकरी संघटनेचे झालेले विघटन भाऊंना दुखावून गेले़ पण शेवटपर्यंत छातीवर शेतकरी संघटनेचा बॅच हा अभिमानाने त्यांनी मिरवला. १७ आॅक्टोबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.

लेखक - प्रा़ पुरुषोत्तम पगारे (राष्टÑपतींच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शिक्षक)

Web Title: Confederate leaders of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.