संगमनेरकरांच्या खिशाला मीटरची झळ
By Admin | Published: May 3, 2016 11:39 PM2016-05-03T23:39:42+5:302016-05-03T23:48:47+5:30
संगमनेर : शहरात नगरपरिषदेने मीटरद्वारे पाणी देण्याचा घेतलेला निर्णय पाणी पट्टीपेक्षा दुपटीने महाग असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
नाराजी : पाणी पट्टीपेक्षा दुप्पट दराने पाणी
संगमनेर : शहरात नगरपरिषदेने मीटरद्वारे पाणी देण्याचा घेतलेला निर्णय पाणी पट्टीपेक्षा दुपटीने महाग असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
पिण्याच्या पाण्याची बचत व्हावी, अपव्यय टाळावा, या उद्देशाने पालिकेने प्रायोगिक तत्वावर वडजे मळा व मेहेर मळा भागातील पाणी टाकीवर अवलंबून असलेल्या १ हजार ७०० नळधारकांच्या नळांना मीटर बसविण्याची मोहीम हाती घेतली आहे. संपदा एजन्सीमार्फत जवळपास ४० टक्के पूर्ण मीटर बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढच्या टप्प्यात संपूर्ण शहरामधील एकूण १२ हजार ५०० नळांना मीटर बसविले जाणार आहेत. पालिका नळधारकांकडून दरवर्षी १ हजार ७०० रूपये प्रमाणे पाणीपट्टी आकारते. आता मीटर बसविल्यावर १ पैसा लीटर प्रमाणे दर आकारणी करण्याचे पाणी पुरवठा समितीने ठरविले आहे. एका कुटूंबात कमीत कमी ५ माणसे असतील तर त्यांना दररोज सरासरी किमान १ हजार लीटर पाणी लागते. १ पैसा प्रती लीटरनुसार १ हजार लीटर पाण्याला दररोज मीटरद्वारे १० रूपये, दरमहा ३०० तर वर्षाला ३ हजार ६०० रूपयांची आकारणी होईल. म्हणजेच १ हजार ७०० रूपयांऐवजी आता दुपटीपेक्षा जास्त पैसे पाण्यासाठी मोजावे लागणार आहेत. पाण्यासाठी छूपी वाढ होणार असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येवून ठेपलेली असताना मीटरद्वारे पाण्याचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आम्ही नगरपरिषदेच्या मिटींगमध्ये हा विषय वारंवार निदर्शनास आणून दिला. ही योजना परवडणारी नाही. किमान ४ ते ५ हजार पाणीपट्टी भरावी लागेल. व्यावसायिकांचे तर कंबरडे मोडेल. नागरिकांनीच याला विरोध केला पाहिजे. पूर्वीच्या पाणीपट्टीच्या वरचा निम्मा बोजा शासनाने उचलावा. म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही.
- कैलास वाकचौरे, नगरसेवक