नाचगाण्यांची थेरपी अन् लसीकरणाचा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:18+5:302021-05-31T04:16:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : राज्यातील काही जिल्ह्यांनी वेगवेगळे उपाय करून कोरोना आटोक्यात आणला. या जिल्ह्यांची चर्चा कमी, पण, ...

The confusion of dance therapy analgesics | नाचगाण्यांची थेरपी अन् लसीकरणाचा गोंधळ

नाचगाण्यांची थेरपी अन् लसीकरणाचा गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : राज्यातील काही जिल्ह्यांनी वेगवेगळे उपाय करून कोरोना आटोक्यात आणला. या जिल्ह्यांची चर्चा कमी, पण, अहमदनगर जिल्ह्याचीच चर्चा अधिक झाली. त्यामागे कारणही तसेच आहे. कोविड केअर सेंटरमधील नाचगाणे आणि लसीकरणाचा गोंधळ, यामुळे जिल्ह्याची प्रतिमा राज्यात मलीन झाली असून, आता तरी गोंधळ थांबवा, असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.

शेजारच्या औरंगाबाद, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटली आहे. नगर जिल्ह्यात मात्र ‘ब्रेक द चेन’चा परिणाम दिसेनासा झाला आहे. दररोज एक हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. संकटाचा सामना करण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये एकजुटीचा अभाव असल्याचे प्रकर्षाने जाणवते आहे. जिल्हा भीतीच्या सावटाखाली असताना नाचगाण्याच्या मैफली मात्र रंगात आल्या आहेत. अर्थात या मैफली रुग्णांची भीती घालविण्यासाठी आयोजित केल्या गेल्या आहेत. परंतु, त्यावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जामखेडच्या कोविड केअर सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. आमदार पवार यांची कोविड सेंटरमधील नाचगाण्याची थेरपी खासदार डॉ. सुजय विखे यांना चांगलीच भावली. तसे त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलूनही दाखविले. त्यांचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी तर कोविड केअर सेंटरमध्ये विश्वशांती महायज्ञ घातला. त्यांचा हा महायज्ञ अंनिसच्या तक्रारीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला. अंनिसच्या तक्रारीचा खुलासा करताना त्यांनी आमदार नीलेश लंके यांच्या कोविड केअर सेंटरमधील नाचगाण्याकडे लक्ष वेधले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नाचगाण्यांचे फड रंगात आले असतानाच शहरात लसीकरणाचा गोंधळ उडाला. शहरात ढीगभर केंद्र आणि चिमूटभर लस, अशी अवस्था आहे. शहरातील कोरोनाची जबाबदारी असलेल्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी तर वाढदिवस साजरा करत धमाल उडवून दिली. कर्तव्यावर असताना दालनातच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवून वाढदिवस साजरा केला गेला. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मनपा आयुक्तांनी शहरात कठोर निर्बंध लागू केले आहे. त्यांचेच अधिकारी हे नियम कसे पायदळी तुडवितात, हे नगरकरांनी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवले. त्यांना गाण्यांची मैफल चांगलीच भावली. आयुक्तांनी त्यांना नोटीस धाडत जाब विचारला असून, आपत्तीची आठवण करून दिली आहे.

.....

जिल्हाधिकाऱ्यांची बॅटिंग मुख्यमंत्र्यांना भावली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेल्या ऑनलाइन संवादामुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही चांगलेच चर्चेत आले. जिलह्यात कोरोनाची दयनीय अवस्था असताना त्यांचे झालेले कौतुक जिल्ह्यातील चर्चेचा विषय ठरला आहे. भोसले यांनी ऑनलाइन बैठकीत केलेल्या सादरीकरणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही दखल घेतली. त्यांनी फोनवरून संवाद साधत भोसले यांचे कौतुक केले.

Web Title: The confusion of dance therapy analgesics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.