शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 11:58 PM2016-05-13T23:58:29+5:302016-05-14T00:02:26+5:30
अहमदनगर : जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा संवर्ग असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शुक्रवारी गोंधळ झाला.
अहमदनगर : जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा संवर्ग असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत शुक्रवारी गोंधळ झाला. तालुकास्तरावरून बदली पात्र शिक्षकांच्या अद्ययावत याद्या न आल्याने दिवसभरात केवळ मुख्याध्यापक आणि विस्तार अधिकारी (शिक्षण) संवर्गातील शिक्षकांच्या बदल्या होऊ शकल्या. ही प्रक्रिया रात्री आठपर्यंत सुरू होती. दरम्यान, माहिती अद्ययावत न ठेवणाऱ्या प्राथमिक शिक्षण विभागातील आणि तालुका पातळीवरील कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची नोटीस देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.
८ हजार ५०० प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केला होता. यात बदली पात्र शिक्षकांची यादी तयार करणे, आदिवासी भागात बदलून जाणारे शिक्षक, आदिवासी भागातून बाहेर बदलून येणारे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांची तालुकानिहाय अद्ययावत याद्या तयार करण्याचे काम प्राथमिक शिक्षण विभागाकडून ंिबनचूक झाले नाही. यामुळे तालुकानिहाय शिक्षकांचे समानीकरण करताना अडचणी निर्माण झाल्या. विशेषकरून राहाता, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्याची माहिती अद्ययावत नव्हती. यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे संतप्त झाले.
सभागृहात त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. मुख्याध्यापकांच्या समानीकरणाची प्रक्रिया दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत रखडली. या तीन तालुक्यांची माहिती अद्ययावत झाल्यावर समानीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. दरम्यान, दुपारी १ वाजता बदली प्रक्रियेला सुरुवात झाली. सुरुवातीला तालुकानिहाय रिक्त असणाऱ्या जागांचा तपशील घेण्यात आला. त्यानंतर प्रत्यक्षात २ वाजता मुख्याध्यापकांच्या पेसांतर्गत बदल्या सुरू झाल्या. पेसातून बाहेर येण्यास बहुतांशी मुख्याध्यापकांनी नकार दिला.
(प्रतिनिधी)
प्राथमिक शिक्षण विभागातील बदल्यांमुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या आवारात शिक्षकांची तोबा गर्दी होती. जिल्हा परिषदेच्या सभागृहाबाहेर शिक्षकांच्या ठिय्यामुळे चालणे मुश्किल झाले होते. प्रशासनाने बदली पात्र शिक्षकांना नगरला बोलवावे, आपसी बदली प्रक्रिया पत्राद्वारे करण्यात यावी, अशी भावना काही शिक्षकांनी बोलून दाखवली. शिक्षक नेते बदली प्रक्रियेच्यावेळी सभागृहात ठाण मांडून होते.
शुक्रवारी पेसातून विनंती बदली १, पेसातून बाहेर १ आणि रिक्त असणाऱ्या जागेवर १ अशा ३ बदल्या झाल्या. तर शेवगाव १०, पाथर्डी ७, जामखेड २ आणि नेवासा ६ अशा २४ बदल्या समानीकरणात झाल्या. आज उपाध्यापक यांच्या बदल्या होणार आहेत. पदवीधर शिक्षकांच्या बदल्या सोमवारी होणार आहेत.
बदली प्रक्रिया सुरू असताना पेसातून बाहेर येण्यास नकार देणाऱ्या मुख्याध्यापकांच्या सह्या कोऱ्या कागदावर येत असल्याचे पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी ंिबनवडे संतप्त झाले. या शिक्षकांची प्रॉपर्टी नावावर करून घ्यायची का? असे सवाल करत रजिष्टरमध्ये नाव नोंदवा. संगणक चालवता येत नाही, नोकऱ्या कशाला करता, असे खडे बोलही त्यांनी यावेळी सुनावले.