एसटी पदाधिकाऱ्याच्या बदलीवरून गोंधळ
By Admin | Published: July 26, 2016 11:49 PM2016-07-26T23:49:36+5:302016-07-26T23:49:36+5:30
अहमदनगर : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव डी. जी. अकोलकर यांची झालेली बदली रद्द करावी,
अहमदनगर : मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव डी. जी. अकोलकर यांची झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी मंगळवारी संघटनेच्या सभासदांनी विभागीय नियंत्रक कार्यालयात एकच गर्दी केली. ही बदली राजकीय दबावातून झाल्याचा आरोप सभासदांनी केला.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटना ही एकमेव मान्यताप्राप्त संघटना असून ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांशी संबंधित काही संघटना राजकीय दबाव आणून मान्यताप्राप्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करतात. परिवहन मंत्री शिवसेनेचे असून सेनेचीही एसटी संघटना आहे. मान्यताप्राप्त संघटनेची गळचेपी करून त्यांना त्यांची संघटना वाढवायची आहे, त्यामुळे ते आकसबुद्धीने पदाधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. याशिवाय परिवहन मंत्र्यांचे एक चालक अहमदनगर विभागातील असून ते मंत्र्यांच्या मर्जीतील आहेत. त्यांच्या सांगण्यावरून जर परिवहनमंत्री बदली करत असतील तर ते दुर्दैवी आहे, असा आरोपही यावेळी पदाधिकाऱ्यांनी केला.
मंगळवारी दुपारी संघटनेचे जिल्हाभरातील शेकडो सभासद विभागीय नियंत्रक कार्यालयात जमा झाले. विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस यांच्यासह उत्तम रणसिंग, रोहिदास आडसूळ, अरुण दळवी, रजनी साळवे, संजय नलगे, दिलीप लबडे आदी निवडक पदाधिकाऱ्यांनी विभाग नियंत्रक अशोक जाधव यांच्याशी चर्चा करून बदली रद्द करण्याची मागणी केली.
(प्रतिनिधी)