गणेश कारखाना निवडणुकीत काँग्रेसचे थोरात अन् भाजपाचे कोल्हे यांच्या पॅनलचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 01:53 PM2023-06-19T13:53:26+5:302023-06-19T13:53:49+5:30
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव
अहमदनगर: राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक मतमोजणी सुरू आहे. १९ जागासाठी शनिवारी मतदान झाले होते. यामध्ये १९ पैकी १८ जागांवर बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या गणेश कारखाना परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयाकडे वाटचाल करत आहेत. फक्त एका जागेवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पॅनलचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांचे कारखान्यातील सत्ता संपुष्टात आली आहे. हा विखे पाटील यांना धक्का आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरुद्ध भाजपच्याच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा एकत्रित पॅनल असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले होते. बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या पॅनलचे उमेदवार सर्वच गटात पुढे आहेत.
गणेश कारखाना सध्या विखे पाटील यांच्या प्रवरा कारखाना व्यवस्थापनाच्या ताब्यात आहे. सभासदांनी मात्र निवडणुकीच्या माध्यमातून हा कारखाना विखे पाटील यांच्या ताब्यातून काढून घेतला आहे. विखे आणि कोल्हे हे भाजपमध्येच आहेत. मात्र कारखाना निवडणुकीवरून अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भाजपमध्ये उभी फुट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. थोरात व कोल्हे यांच्या परिवर्तन पॅनलला १९ पैकी १८ जागा मिळाल्याने दोन्ही समर्थकांकडून गुलालाची उधळण सुरू झाली आहे. फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालांची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे.