अहमदनगरमध्ये सावरकर मुद्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

By साहेबराव नरसाळे | Published: April 14, 2023 05:53 PM2023-04-14T17:53:11+5:302023-04-14T17:53:37+5:30

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत.

Congress-BJP clash again over Savarkar issue in Ahmednagar | अहमदनगरमध्ये सावरकर मुद्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

अहमदनगरमध्ये सावरकर मुद्यावरून काँग्रेस-भाजपमध्ये पुन्हा संघर्ष

अहमदनगर : सावरकर मुद्यावरून देशभरात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार संघर्ष रंगला होता. मात्र नगरमध्ये प्रथमच सावरकर मुद्यावरून भाजप व काँग्रेसमध्ये सुरू झाला आहे. विनायक सावरकरांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान होते, असे वक्तव्य काँग्रेसचे शहर जिल्हाद्यक्ष किरण काळे यांनी आंबेडकर जयंती कार्यक्रमात केले. त्यानंतर काळे यांच्या वक्तव्याचा निषेध करीत भाजपनेही काळे यांनी माफी मागावी, अन्यथा भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला. सावरकर विरोधी वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी गेली. दिल्लीतील शासकीय निवासस्थान सोडावे लागले. आता त्यांची अवस्था ना घर का ना घाट का, अशी झाली आहे. तशीच अवस्था किरण काळे यांचीही होईल, असे लोढा यांनी म्हटले आहे. 

आंबेडकर जयंती कार्यक्रमात किरण काळे म्हणाले, आज देशामध्ये परिस्थिती चिघळविण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. आपल्या राजकीय अजेंड्यासाठी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा डाव काही प्रवृत्ती राबवित आहेत. मात्र देशाला स्थिर ठेवण्याची ताकद देशाच्या संविधानामध्ये आहे. महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधानच देशाचे अखंडत्व टिकवू शकते. विनायक सावरकरां पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे कार्य महान आहे. डॉ. आंबेडकर यांनी सर्व धर्म समभावाचे संविधान या देशाला दिले नसते तर आज व्यक्ती स्वातंत्र्याची देखील गळचेपी झाली असती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी तमाम शिवप्रेमींना अभिमानाचा, गर्व आहे. जगात असा राजा आजवर झाला नाही. क्रांतीसुर्य महात्मा फुले, सावित्रीमाई फुले यांनी तत्कालीन सामाजिक रूढी परंपरांना छेद देत शिक्षणाची कवाडं खुली केली नसती तर आज बहुजन समाज शिकू शकला नसता. शाहू महाराजांनी देखील समाज सुधारणेच काम केले. छ. शिवाजी महाराज, शाहू, फुले,आंबेडकरांच्या कामाच्या तुलनेत सावरकर यांचे काम अत्यंत छोट्या स्वरूपाचे होते, असे विधान काळे यांनी केले आहे. 

त्यांच्या या वक्तव्यनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी तात्काळ पत्रक काढून काळे यांनी माफी मागावी, असे म्हंटले. 
लोढा यांनी पत्रकात म्हटले आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या प्रखर देशभक्ताबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करून शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष किरण काळे यांनी राहुल गांधी यांच्या प्रमाणेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमन केला आहे. ज्या सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिवावून देण्यासाठी आयुष्य झिजवत दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा भोगली अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान भारतीय जनता पार्टी कदापी सहन करणार नाही. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांप्रती अपशब्द वापरल्याने आज राहुल गांधीची काय अवस्था झाली आहे ? खासदारकी गेली, दिल्लीमधील शासकीय घर सोडण्याची नामुष्की त्यांच्यावर आल्याने त्यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. किरण काळे ही राहुल गांधींप्रमणे अक्षेपार्ह वक्त्याव्य करत आहेत. त्यांची ही अवस्था राहुल गांधीं सारखीच होईल. त्यामुळे किरण काळेंनी त्वरित सावरकरांची व जनतेची माफी मागावी. अन्यथा शहर भाजप शांत बसणार नाही, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी दिला आहे.

Web Title: Congress-BJP clash again over Savarkar issue in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.