काँग्रेसला लागली युवकांची काळजी
By Admin | Published: May 18, 2014 11:36 PM2014-05-18T23:36:10+5:302024-04-10T11:42:59+5:30
बाभळेश्वर : पराभवामुळे खचून जाऊ नका, एकमेकांना दोष देऊ नका़ आपण कोठे कमी पडलो, याचा शोध घ्या़ देशात निर्माण झालेल्या लाटेत युवक वर्ग आकर्षित झाला आहे़
बाभळेश्वर : पराभवामुळे खचून जाऊ नका, एकमेकांना दोष देऊ नका़ आपण कोठे कमी पडलो, याचा शोध घ्या़ देशात निर्माण झालेल्या लाटेत युवक वर्ग आकर्षित झाला आहे़ या युवकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न समजून घ्या़ भविष्यात सामाजिक न्यायाच्या विचाराने काँग्रेस कार्यकर्त्यांनी काम करीत रहावे, असा सल्ला माजी केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे यांनी कार्यकर्त्यांना दिला़ लोकसभा निवडणुकीतील पराभवाची कारणे शोधण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची चिंतन बैठक झाली़ यावेळी डॉ़ विखे बोलत होते़ यावेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, सभापती निवास त्रिभुवन, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब डांगे, युवक काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ सुजय विखे, नगराध्यक्ष कैलास सदाफळ, डॉ़भास्करराव खर्डे, एम़ एम़ पुलाटे, भाऊसाहेब कडू उपस्थित होते़ बाळासाहेब विखे म्हणाले की, गेली अनेक वर्ष आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहोत़ पक्षाच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवित आहोत़ भविष्यातही प्रश्न निर्माण होणार आहेत. मात्र आता प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी धोरण घेताना राजकीय, सामाजिक विचार घेऊनच पक्षाला आणि कार्यकर्त्यांना पुढे जावे लागेल़ राधाकृष्ण विखे यांनी आपल्या भाषणात केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्ष संघटनेत समन्वयाचा अभाव राहिला़ केंद्र सरकारने केलेले काम प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचले नाही़ ऐन निवडणुकीत सर्वत्र निर्माण झालेल्या विजेचा प्रश्न आणि पाणी प्रश्नाचा असंतोषही मतदानाच्या माध्यमातून व्यक्त झाला़ (वार्ताहर)