काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
By शेखर पानसरे | Published: May 8, 2024 08:30 PM2024-05-08T20:30:36+5:302024-05-08T20:32:23+5:30
Lok Sabha Election 2024 : पुन्हा काँग्रेस उभी राहता कामा नये. असे काम केले पाहिजे, ही खरी देशभक्ती आहे. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
संगमनेर : राहुल गांधी परदेशात जावून प्रधानमंत्र्यांची, आपल्या देशाची बदनामी करतात. भारत जोडो का भारत तोडो यात्रा काढतात. त्यांना तुम्ही मते देणार का? काँग्रेस हा देशाचा दुश्मन आहे, तो पाकिस्तानची बोली बोलू लागला आहे. म्हणून हिंदुस्थानमधला प्रत्येक नागरिक पेटून उठला पाहिजे. या काँग्रेसची धुळधाण केली पाहिजे. पुन्हा काँग्रेस उभी राहता कामा नये. असे काम केले पाहिजे, ही खरी देशभक्ती आहे. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
बुधवारी (दि. ०८) येथील मालपाणी लॉन्समध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्राचारार्थ आयोजित संकल्प सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, माजीमंत्री बबनराव घोलप, माजी खासदार आनंद आडसूळ, माजी आमदार वैभव पिचड, यवतमाळ-वाशिम येथील महायुतीच्या उमेदवार जयश्री पाटील, अमोल खताळ-पाटील, कपील पवार, ॲड. श्रीराज डेरे, कमलाकर कोते, आबासाहेब थोरात, रमेश काळे, दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, सोमनाथ भालेराव, ॲड. श्रीराम गणपुले, किशोर डोके, जावेद जहागिरदार, सरूनाथ उंबरकर, वैभव लांडगे, डॉ. अशोक इथापे, संजीव भोर आदी यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शरद पवार म्हणतात, सर्व प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. उबाठाचे पहिल्यापासून काँग्रेसीकरण झालेले आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना ते काहीही बोलत नाहीत, ते बाळासाहेबांचे विचार विसरले. बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेसला लांब ठेवा, काँग्रेसपासून लांब रहा. माझी काँग्रेस होऊ देणार नाही आणि माझी काँग्रेस होईल, तेव्हा माझे शिवसेना दुकान बंद करेल. त्या बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, खुर्चीसाठी सगळे सोडले. आणि आज तुम्हाला काँग्रेसची भाषा, पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसावे लागते आहे. काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, अशा लोकांना तुम्ही मतदान करणार? हिंदुस्थानमध्ये राहून पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांना इकडे थारा नाही.