पंचायत समितीत काँग्रेसच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:29+5:302021-04-01T04:21:29+5:30
उच्च न्यायालय : शिंदे यांची याचिका फेटाळली श्रीरामपूर : पंचायत समितीत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी डॉ. वंदना मुरकुटे यांच्या नियुक्तीला ...
उच्च न्यायालय : शिंदे यांची याचिका फेटाळली
श्रीरामपूर : पंचायत समितीत काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी डॉ. वंदना मुरकुटे यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे. जिल्हाधिकारी यांनी मुरकुटे यांच्या गटनेतेपदाला दिलेल्या मान्यतेला सभापती संगीता शिंदे यांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
पंचायत समितीच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे चार सदस्य विजयी झाले होते. त्यावेळी संगीता शिंदे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात गटनेतेपदी निवडीची नोंद करण्यात आली होती. मात्र जानेवारी २०२० मध्ये सभापतिपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडी घडल्या. त्यावेळी काँग्रेसच्या तीन सदस्यांनी दिलेल्या अर्जावरून जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी शिंदे यांच्याऐवजी मुरकुटे यांना गटनेते केले. नंतर तशी नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या निवडीस शिंदे यांनी हरकत घेत याचिका दाखल केली होती.
गटनेता पूर्णकाळ कायम राहील अशी घटनेत तरतूद नाही. ज्या गटाने प्रारंभी शिंदे यांनी गटनेता केले त्याच गटाने नव्याने मुरकुटे यांची नियुक्ती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मान्यतेत हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला. मुरकुटे यांच्या वतीने ॲड.राहुल कर्पे व ॲड. योगेश शिंदे यांनी काम पाहिले. हा आदेश महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सभासद अपात्रता कायद्यांतर्गत सदस्य अपात्रतेच्या प्रकरणांमध्ये दिशादर्शक ठरेल, अशी माहिती ॲड. राहुल कर्पे यांनी दिली.