काँग्रेस आघाडीत फाटाफूट, निवड बिनविरोध
By Admin | Published: September 14, 2014 11:13 PM2014-09-14T23:13:01+5:302024-03-26T15:22:20+5:30
अहमदनगर : नगर तालुका पंचायत समितीवर आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला. सेनेचे तालुका प्रमुख संदेश कार्ले यांची सभापतीपदी तर भाजपाचे शरद झोडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.
अहमदनगर : नगर तालुका पंचायत समितीवर आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला. सेनेचे तालुका प्रमुख संदेश कार्ले यांची सभापतीपदी तर भाजपाचे शरद झोडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडीची प्रक्रिया बिनविरोध झाली.
नगर पंचायत समिती कार्यालयात रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून सभापती-उपसभापती पदासाठी निवडीची प्रक्रिया सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वामन कदम यांनी कामकाज पाहिले. सभापतीपदासाठी सेनेकडून संदेश कार्ले यांनी तर राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांनी अर्ज दाखल केले. उपसभापतीपदासाठी भाजपाकडून शरद झोडगे यांनी तर काँग्रेसकडून उज्ज्वला कापसे यांनी अर्ज दाखल केले. मात्र पंचायत समितीत सेना-भाजपाचे ७ सदस्य तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे ५ सदस्य असे पक्षीय बलाबल असले तरी काँग्रेसच्या जयश्री दरंदले व ताराबाई कासार तसेच राष्ट्रवादीचे राजू शेवाळे यांनी युतीच्या गोटात सामील होणे पसंत केल्याने मोकाटे व कापसे एकाकी पडले. अर्ज माघारीच्या वेळी त्यांनीही आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कदम यांनी संदेश कार्ले यांची सभापतीपदी व शरद झोडगे यांची उपसभापतीपदी निवड जाहीर केली. यानंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. (तालुका प्रतिनिधी)
पडद्याआडून घडल्या घडामोडी
सभापती-उपसभापतीपदासाठी निवड होण्यापूर्वी नगर तालुक्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. आ.शिवाजी कर्डिले, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी सर्व सदस्यांच्या स्वतंत्र मुलाखती घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यानंतर काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादीचा एक सदस्य असे मिळून १२ पैकी १० चे संख्या बळाची जुळवाजुळव केली. उपसभापतीपदासाठी अर्ज केलेल्या उज्ज्वला कापसे याही नंतर युतीच्या गोटात सामील झाल्या. यात सर्वपक्षीय एकत्र आल्याचे दिसून आले.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांमध्ये फाटाफूट झाल्याने मी सभापतीपदासाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला. काँग्रेसचे दोन सदस्य युतीत सामील झाले तर उपसभापतीचा आमचा उमदेवारही युतीने धनशक्तीच्या जोरावर फोडला. यामुळे मी निवडणुकीतून माघार घेतली.
-गोविंद मोकाटे (सदस्य, राष्ट्रवादी)
पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या विकासाला चालना देऊ. सर्व सदस्यांनी मला बिनविरोध करून माझ्यावर विश्वास दाखवल्याने पक्षीय राजकारण न करता सर्वांना विश्वासात घेऊन काम करू. पंचायत समितीला सक्षम पदाधिकारी मिळाल्याने प्रशासनात व विकास प्रक्रिया आता गतिमान करून कामकाजात पारदर्शकता आणू.
-संदेश कार्ले (सभापती, नगर)