आयटी पार्कच्या मागणीसाठी काँग्रेसने केले एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषण
By साहेबराव नरसाळे | Published: May 4, 2023 04:04 PM2023-05-04T16:04:25+5:302023-05-04T16:05:01+5:30
अहमदनगरमध्ये काँग्रेसचे लाक्षणिक एक दिवसीय उपोषण
साहेबराव नरसाळे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: वुई वॉन्ट आयटी पार्क, वुई वॉन्ट एम्प्लॉयमेंट, वुई वॉन्ट डेव्हलपमेंट, स्टॉप मायग्रेशन, स्टॉप ब्रेन ड्रेन अशी घोषवाक्य लिहिलेले फलक हातात धरत शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एमआयडीसी कार्यालयासमोर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने आयटी पार्क सुरू करण्याच्या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
शहराचे आमदार, दक्षिण जिल्ह्याचे खासदार, पालकमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण करण्यात आल्याचे काळे म्हणाले. काळे म्हणाले, याच एमआयडीसीमध्ये उभारण्यात आलेल्या तथाकतीत खोट्या आयटी पार्कचा भांडाफोड काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुमारे दीड वर्षांपूर्वी केला होता. त्यावेळी माझ्यासह कार्यकर्त्यांवर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वैयक्तिक, राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र शहरातील युवकांच्या रोजगारासाठी आणि उद्योग वाढीसाठी असे शंभर गुन्हे अंगावर घेण्याची काँग्रेसची तयारी आहे. महापुरुषांचे विचार जपायचे असतील तर त्यासाठी त्यांच्या पुतळ्यांबरोबरच कृतीतून ते जपले पाहिजेत. आज शहरातील हजारो तरुण नोकरीच्या निमित्ताने पुण्या, मुंबईकडे स्थलांतरित झाले व होत आहेत. हे स्थलांतर थांबणे गरजेचे आहे.
या उपोषणात ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरिवाला, युवक उपाध्यक्ष आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, समीर शेख, प्रणव मकासरे, शंकर आव्हाड, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, बिबीशन चव्हाण, मयूर भिंगारदिवे, आकाश डहाणे आदी तरुण सहभागी झाले होते.