काँग्रेसच्या भरत नाहाटांचे नगरसेवकपद अपात्र
By Admin | Published: January 28, 2015 02:00 PM2015-01-28T14:00:27+5:302015-01-28T14:00:27+5:30
विना परवाना संरक्षण भिंत बांधल्या प्रकरणी नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नाहाटांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले आहे. त्यामुळे पालिकेच्या विरोधी गटात खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका नियोजन समितीचे सभापती भरतकुमार नाहाटा यांनी श्री संत शेख महंमद महाराज पतसंस्थेच्या रेसिडेंसी इमारतीसाठी विना परवाना संरक्षण भिंत बांधल्या प्रकरणी नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी नाहाटांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविले आहे. त्यामुळे पालिकेच्या विरोधी गटात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात उपनगराध्यक्ष अख्तार शेख यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती. भरतकुमार नाहाटा चेअरमन असलेल्या संत शेख महंमद महाराज पतसंस्थेचे सिटी सर्व्हे नं. ६१४ मधील ए व बी विंग इमारतींना बांधकाम परवानगी घेतली त्यामुळे संरक्षण भिंत बांधकामाचा उल्लेख नव्हता. मात्र संस्थेने संरक्षण भिंत बांधली.
दि. २१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी झाली. नाहाटांना महाराष्ट्र नगरपालिका नागरी १९६५ चे कमल ४४ (१) ई नुसार पालिका नगरसेवकपद धारण करण्यास अनर्ह ठरविणेत येत आहे. असा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला. मात्र मुख्याधिकारी नगरपालिका श्रीगोंदा यांनी पतसंस्थेच्या इमारत परवानगीबाबत खात्री करावी. सदर इमारतीस आवार भिंती बांधकाम विनापरवाना असल्यास महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलमांतर्गत कार्यवाही करावी.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशासंदर्भात श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी भरतकुमार नाहाटांना नोटीस बजावली आहे. (तालुका प्रतिनिधी)
■ पालिकेत सत्ताधारी व विरोधी गटामध्ये कठावरील संख्याबळ आहे. विरोधी नेत्यांनी पोपटराव कोथिंबिरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपाचे नगरसेवक नाना कोथिंबिरे यांना नगरसेवक पदावरून अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न फसला. आता काही नेत्यांनी अख्तार शेख यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भरत नाहाटांची राजकीय शिकार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पालिकेच्या गटातटाच्या राजकारणातून कोण कुणाचा बळी घेईल हे सांगणे अवघड आहे.
न्यायालयात आव्हान!
कागदी घोडे नाचवून मला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयास हायकोर्टात आव्हान देणार आहे. न्यायालयात निश्चितच दूध का दूध और पाणी का पाणी होईल. - भरतकुमार नाहाटा, सभापती, नियोजन समिती, श्रीगोंदा नगरपालिका